#UP Election 2022 : भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल

कुशीनगर -भाजपच्या खासदार संघमित्रा मौर्य यांच्याविरोधात भाजपच्याच नेत्यांकडून हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघमित्रा मौर्य यांचे वडील स्वामी प्रसाद मौर्य हे समाजवादी पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. संघमित्रा यांनी आपल्या वडिलांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांच्या “रोड शो’ दरम्यान वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक झाली होती.

त्यावेळी अनेक वाहनांच्या काचा फुटल्या होत्या. याप्रकरणी खासदार संघमित्रा मौर्य, त्यांचे बंधू अशोक मौर्य आणि अन्य 30 जणांच्या विरोधात दंगल माजवणे, लुटालूट करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय अल्पसंख्याक कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांच्याविरोधात भाजप नेते दीपराज खंवर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

दरम्यान, आपल्या वाहनांच्या ताफ्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केली, असा आरोप स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आपण दुसऱ्या कारमध्ये होतो. वाटेमध्ये भाजपचे कार्यकर्ते काठ्या, दगड आणि बंदुका घेऊन बसले होते. त्यांनीच आपल्या कारवर हल्ला केला असा दावा मौर्य यांनी केला. संघमित्रा मौर्य यांनीही या हल्ल्यासाठी भाजपच्याच कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या कारलाही घेराव घातला होता, असाही दावा त्यांनी केला आहे.