#UP Election 2022 : प्रत्येक मत भाजपला विक्रमी विजय मिळवून देईल

गाझीपूर -उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिलेले प्रत्येक मत भारतीय जनता पक्षाला विक्रमी विजय मिळवून देईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेत बोलताना केले. ते म्हणाले की उत्तरप्रदेशातील जनता परिवारवादी पक्षांना त्यांची जागा दाखवून देईल.

मोदी म्हणाले की परिवारवादी पक्षांनी त्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे उत्तरप्रदेशला बदनाम केले आहे. निवडणुकीच्या निमीत्ताने अशा राजकीय घराणेशाहीला शिक्षा करण्याची संधी जनतेला मिळत असते त्याचा त्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या पक्षांनी उत्तरप्रदेश हा प्रांत माफिया आणि बाहुबलींचा प्रांत करून टाकला होता. त्यामुळे या पक्षांना मतदारांनीच अद्दल घडवली पाहिजे असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या सहाव्या टप्प्यात उद्या मतदान होणार असून, राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 57 विधानसभा जागांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 676 उमेदवारांचे भवितव्य उद्याच्या मतदानाने निश्‍चित होणार आहे.

उद्या मतदान होणाऱ्या 57 जागांपैकी गेल्या निवडणुकीत भाजपने 46 जागा जिंकल्या होत्या, तर अपना दल पक्षाने एक जागा जिंकली होती. समाजवादी पक्षाने केवळ दोन जागा जिंकल्या होत्या, तर बहुजन समाज पक्षाने पाच जागा जिंकल्या होत्या. कॉंग्रेस आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती.सहाव्या टप्प्यात गोरखपूर, आंबेडकरनगर, बलिया, बलरामपूर, बस्ती, देवरिया, कुशीनगर, महाराजगंज, संत कबीर नगर आणि सिद्धार्थनगर या 10 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे.