#UP Election 2022: वाराणसीतील प्रचार सभेत ममता व जयंत चौधरी होणार सहभागी

नोएडा -गुरुवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांच्या संयुक्त प्रचार सभेत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याहीं सहभागी होणार आहेत. वाराणसीच्या हरहुआ ब्लॉकमधील ऐर्हे गावात दुपारी ही संयुक्त सभा होणार आहे.वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ आहे. तेथे विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान होत आहे.

ममतांनी 7 फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेशचा दौरा करून अखिलेश यादव यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी त्यांनी अखिलेश यांच्या समवेत संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती. तर जयंत चौधरी यांच्या पक्षाचा पश्‍चिमी उत्तरप्रदेशात प्रभाव असून तेथे त्यांनी अखिलेश यादव यांच्या पक्षासोबत आघाडी केली आहे. पश्‍चिमी उत्तरप्रदेश सोडून ते मात्र अन्यत्र फारशा प्रचार सभांमध्ये दिसले नव्हते. पण तेही आता वाराणसी जिल्ह्यातील सभेत सहभागी होणार आहेत.