#UP Election 2022: राजाभैय्यांनी केले योगींच्या कारभाराचे कौतुक

कुंडा (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील बाहुबली नेते म्हणून ओळखले जाणारे राजाभैय्या यांनी योगी अदित्यनाथ यांच्या सरकारच्या कार्याचे कौतुक केले आहे. आमदार कुंवर रघुनाथ प्रताप सिंह ऊर्फ राजाभैय्या हे अपक्ष आमदार असले तरी ते राजकीयदृष्ट्या भाजपच्या जवळचे मानले जातात.

अलीकडेच त्यांनी स्वत:चा राजकीय पक्षही स्थापन केला असून जनसत्ता दल लोकतांत्रिक असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे. राजाभैय्या यांचा त्यांच्या स्वत:च्या मतदार संघात राजकीय प्रभाव तर आहेच पण आजुबाजूच्या काही मतदार संघांवरही त्यांचा प्रभाव आहे. गेली पाच वर्ष त्यांनी भाजप सरकारला समर्थन दिले होते. या निवडणुकीत त्यांनी आपली नेमकी राजकीय भूमिका स्पष्ट केली नसली तरी त्यांनी योगी सरकारचे जाहीर कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, विद्यमान सरकारने मागील सरकारपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. रस्ते बांधणे, वीज जोडणी देणे आणि कालवे खोदणे या बाबतीत योगी सरकारने मागील सरकारांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले आहेत. कुंडा मतदार संघात राजाभैय्या यांच्या विरोधात समाजवादी पक्षाने दोन दशकांनंतर प्रथमच आपला उमेदवार उभा केला आहे.

समाजवादी पक्षाकडून तेथे गुलशन यादव हे राजाभैय्या यांना लढत देत आहेत. तथापि, गेल्या निवडणुकांप्रमाणेच आपण याही वेळी सर्वच विरोधी उमेदवारांच्या अनामत जप्त करू असा विश्‍वास राजाभैय्यांनी व्यक्त केला आहे. या मतदार संघात भाजपच्या वतीने सिंधुजा मिश्रा, आणि बसपाचे मोहम्मद फहीम हे निवडणूक लढवत आहेत.