स्वीडन, फिनलंडच्या प्रवेशाला नाटोची संमती

ब्रुसेल्स – स्वीडन आणि फिनलंड या देशांच्या “नाटो’मधील प्रवेशाला “नाटो’तील सदस्य असलेल्या 30 देशांनी सहमती दिली आहे. या सर्व देशांचे संमती पत्र “नाटो’कडे पाठवण्यात आले आहे. आता “नाटो’च्या मुख्यालयातून या दोन्ही देशांच्या सहभागाला औपचारिक मान्यता दिली जाणे बाकी आहे.

“नाटो’ने गेल्या आठवड्यात झालेल्या परिषदे दरम्यान फिनलंड आणि स्वीडनला सहभागी करून घेण्यासाठी निमंत्रण दिले होते. आता 30 सदस्य देशांच्या “नाटो’तील सदस्य देशांच्या राजदूतांनी आणि कायम प्रतिनिधींनी या निर्णयाला औपचारिक मान्यता दिली आहे. या दोन देशांच्या सहभागाला तुर्कीने आगोदर आक्षेप घेतला होता.

मात्र तुर्कीचे आक्षेप दूर केले गेल्यानंतर तुर्कीनेही या देशांच्या सहभागाला मान्यता दिली होती. यासंदर्भातील एका करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या आहेत. मात्र तरिही तुर्की ऐनवेळी काही आक्षेप घेऊ शकतो. तसे झाल्यास ऐनवेळीही या देशांचा “नाटो’तील सहभाग अडचणीत येऊ शकतो.

रशियाने फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाविरोधात मोठी मोर्चेबांधणी झाली आहे. आता “नाटो’तील सदस्य देशांनी स्वीडन आणि फिनलंडच्या सहभागाला मान्यता दिल्यामुळे रशिया आणखीन एकटा पडणार आहे. हा क्षण स्वीडन, फिनलंड आणि “नाटो’साठी खरोखर ऐतिहासिक आहे, अशी प्रतिक्रिया “नाटो’चे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेन्बर्ग यांनी दिली आहे.