‘अल कायदा’चा कमांडर अब्दुल हमिद अल मतारचा ड्रोन हल्ल्यात खात्मा

दमास्कस – अल कायदाच्या वरिष्ट कमांडरचा अमेरिकेने सीरियात ड्रोन हल्ल्यात खात्मा केला आहे. पेटॅगॉनने ही माहिती दिली आहे. सीरियाच्या दक्षिणेकडे अमेरिकेच्या तळावर अल कायदाने एक हल्ला केल्याच्या दोनच दिवसांनी अमेरिकेने ही कारवाई केली आहे. दहशतवादी संघटनाविरोधातील कारवाईसाठी या तळाचा वापर केला जात होता.

उत्तर सीरियामध्ये अमेरिकेने केल्या ड्रोन कारवाईमध्ये अल कायदाचा अब्दुल हमिद अल मतार हा मारला गेला, असे पेंटॅगॉनच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते मेजर जॉन रिग्सबी यांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने म्हटले आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानांच्या एमक्‍यू-9 विमानांच्या ताफ्याने ही कारवाई केल्याचे या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. या हल्ल्यात अल कायदाच्या कमांडरसह अन्य तिघेजण मारले गेले. या म्होरक्‍याला मारल्यामुळे अल कायदाला यापुढे या भागात दहशतवादी हल्ल्यांच्या घातपाती कारवाया करणे अवघड बनणार आहे, असे या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

अल कायदाचा अमेरिकेला आणि मित्र देशांसाठी अजूनही धोका कायम आहे. सीरियामध्ये अल कायदासाठी अजूनही सुरक्षित आश्रय दिला जातो आहे. या भागातून अल कायदाला आश्रय, समन्वय आणि परदेशातील मदत मिळते आहे, असेही या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.