US presidential election 2024 : जगातील सर्व देशांपेक्षा अमेरिकेच्या निवडणुकीवर होतो सर्वाधिक खर्च; 2020 च्या निवडणुकीचा खर्च पहा..

वॉशिंग्टन – अमेरिकेत पुढच्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जगासाठी महत्वाची असते आणि त्यामुळेच सगळ्यांचे त्याकडे लक्षही असते. मात्र ही निवडणूक तेवढीच खर्चिकही असते. आताच्या निवडणुकीचे वातावरण अगोदरच तापले आहे.

त्यातच कोलोरॅडो येथील न्यायालयाने माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा ही निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरवले आहे. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत तर दुसरीकडे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि गेल्या वेळी ज्यांच्याशी सामना झाला होता, ते डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्टपती ज्यो बायडेनही पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अमेरिकेतील निवडणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीत केल्या जाणाऱ्या खर्चाची कोणीतही मर्यादा निर्धारित केलेली नाही. याचा अर्थ एक पक्ष कितीही खर्च करू शकतो. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत उपलब्ध आकडेवारीनुसार प्रती उमेदवार १ अब्ज डॉलर खर्च झाला होता. याचा अर्थ ६८०० कोटी रूपये खर्च झाले होते.

ॲडव्हर्टायझिंग ॲनालिटीक्स क्रॉस स्क्रिन मीडियाच्या अहवालानुसार गेल्या निवडणुकीत म्हणजे २०२० च्य निवडणुकीत करोनामुळे जाहीर कार्यक्रमांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र टीव्ही, सोशल मीडिया आणि जाहीरातींवर उमेदवारांनी भरपूर खर्च केला. हा खर्च १४ अब्ज डॉलरपर्यंत गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा आकडा अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीतील सगळ्यांत जास्त खर्च आहे.

निधीसाठीचा कायदा
अमेरिकेतील कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती कोणत्याही उमेदवाराला २८०० डॉलरपेक्षा अधिक देणगी देऊ शकत नाही. तथापि, निवडणुकीतील कोणीही उमेदवार त्याच्या खासगी मालमत्तेतून त्याला हवा तेवढा खर्च करू शकतो. जे उमेदवार श्रीमंत नाहीत किंवा ज्यांच्याकडे खर्च करण्यासाठी खासगी मालमत्ता नाही असे उमेदवारही निवडणुकीत अब्जावधी डॉलर खर्च करू शकतात कारण राजकीय कृती समितींना अमर्याद निधी जमविण्याची सूट तेथे दिली आहे. मात्र या समित्या उमेदवारांशी थेट संलग्न नसतात. अमेरिकेच्या कायद्यानुसार प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना प्रचारासाठी निधी दिला जातो. ज्या बैठकांमध्ये उमेदवारांचे नामांकन होते त्या बैठकांसाठी १९७६ पासून २०१२ पर्यंत पैसे दिले जात होते. मात्र २०१४ नंतर या नामांकनासाठीच्या बैठकांना निधी देणे बंद करण्यात आले.

बायडेन यांना सगळ्यांत जास्त निधी
२०२० च्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त निधी गोळा केला होता. अमेरिकेच्या इतिहासात हा एक रेकॉर्ड आहे. त्यांच्या पक्षाने विविध अभियानांतून १४ ऑक्टोबर २०२० पर्यंत ९३८ दशलक्ष डॉलर इतका विक्रमी निधी किंवा देणग्या गोळा केल्या होत्या. त्या तुलनेत माजी राष्ट्रपती ट्रम्प यांनी ५९६ दशलक्ष डॉलर निधी जमवला होता.

वेतन आणि भत्ते सगळ्यांत जास्त
जगात अमेरिकेच्या राष्ट्रपतींना सगळ्यांत जास्त वेतन आणि भत्ते मिळतात. त्यांना प्रतिवर्ष ४०,०००० डॉलर अर्थात २,९४,१९,४४० रूपये वेतन दिले जाते. भारताच्या राष्ट्रपतींच्या वेतनाच्या तुलनेत ही रक्कम पाच पट जास्त आहे.

निवडणुकीला उभे राहण्यासाठी अटी
१. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढणारा उमेदवार जन्माने अमेरिकी नागरिक असावा
२. त्याचे वय किमान ३५ वर्षे असावे
३. उमेदवाराचे किमान १४ वर्षे अमेरिकेत वास्तव्य असावे

निवडणूक आणि खर्च (कोटी रूपये)
२००० २२०००
२००४ ३००००
२००८ ३६०००
२०१२ ४५०००
२०१६ ४९०००
२०२० १,१२०००