#Ashes | ख्वाजाच्या शतकाने ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

सिडनी  – उस्मान ख्वाजाने फटकावलेल्या अफलातून शतकाच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या ऍशेस कसोटीत दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव 8 बाद 416 धावांवर घोषित केला. खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 5 षटकात बिनबाद 13 धावा केल्या आहेत. जॅक क्राऊली व हतीब हमीद प्रत्येकी 2 धावांवर खेळत आहेत.

पहिल्या दिवशीच्या 3 बाद 126 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर स्टिव्हन स्मिथ व ख्वाजा यांनी संघाला बळकटी प्राप्त करून दिली. या दोघांनी आपापली अर्धशतके थाटात पूर्ण केली. स्मिथ मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच 67 धावांवर बाद झाला. मात्र, त्यापूर्वी त्याने ख्वाजासह शतकी भागीदारी करत संघाला द्विशतकी मजल मारून दिली.

ख्वाजाने त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखत दमदार शतक साकार केले. त्याने 137 धावांची खेळी करताना अलेक्‍स कॅरी, कर्णधार पॅट कमिन्स व मिशेल स्टार्कसह संघाला चारशे धावांचा डोंगर उभा करून दिला. ख्वाजा बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव घोषित केला. स्टार्क 34 धावांवर तर, नाथन लॉयन 16 धावांवर नाबाद राहिले.

इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने 5 गडी बाद केले. दिवसातील उर्वरित पाच षटके खेळून काढताना इंग्लंडच्या जॅक क्राऊली व हसीब हमीद यांनी 13 धावा केल्या व एकही नुकसान होऊ दिले नाही. इंग्लंड अद्याप 403 धावांनी पिछाडीवर आहे. यंदाच्या ऍशेस कसोटी मालिकेतील पहिल्या तीनही कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने ऍशेस आपल्याकडे राखल्या असून 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 134 षटकांत 8 बाद 416 धावा घोषित. (उस्मान ख्वाजा 137, स्टिव्हन स्मिथ 67, मार्कस हॅरिस 34, डेव्हीड वॉर्नर 30, मार्नस लेबुशेन 28, पॅट कमिन्स 24, मिशेल स्टार्क नाबाद 34, नाथन लॉयन नाबाद 16, स्टुअर्ट ब्रॉड 5 -101). इंग्लंड पहिला डाव – 5 षटकांत बिनबाद 13 धावा. (जॅक क्राऊली खेळत आहे 2, हसीब हमीद खेळत आहे 2).