बोगद्यात अडकलेल्या कामगारांनी 11 दिवसानंतर घासले दात, कपडे बदलले, जेवण केले.., आज येणार बाहेर

uttarkashi tunnel collapse rescue: बुधवारी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांनी 11 दिवसानंतर दात घासले, कपडेही बदलले. अत्यावश्यक खाद्यपदार्थांबरोबरच कपडे आणि औषधेही कामगारांना पाठवण्यात आली आहेत. कामगारांना चार आणि सहा इंची लाईफ पाईप्सद्वारे अन्नपदार्थ सतत पाठवले जात आहेत.

बुधवारी त्यांना रोटी, भाजी, खिचडी, दलिया, संत्री आणि केळी पाठवण्यात आले होते. टी-शर्ट, अंडरगारमेंट, टूथपेस्ट आणि ब्रशसोबतच त्यांना साबणही पाठवण्यात आला. कामगारांनी कपडे बदलले, हात धुतले आणि जेवण केले. सर्व मजुरांना टेलिस्कोपिक कॅमेऱ्याच्या मदतीने पाहिले गेले आहे.

आतापर्यंत बोगद्याच्या आतील कामगारांचे स्वरूप केवळ दुर्बिणीच्या कॅमेऱ्यांद्वारेच दिसत होते, मात्र बुधवारी दिवसभरात एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमने येथे ऑडिओ सिस्टीमही तयार केली. त्यासाठी बोगद्याच्या आत सहा इंची पाईपद्वारे मायक्रोफोन आणि स्पीकर पाठवण्यात आले. सर्वांशी बोलून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती विचारली. सचिव डॉ. नीरज खैरवाल यांनी सांगितले की, दोन मजुरांनी बराच वेळ अन्न न घेतल्याने सकाळी पोटदुखीची तक्रार केली होती. पाईपद्वारे तात्काळ त्याच्याकडे औषधी पाठवण्यात आली, त्यानंतर कोणतीही तक्रार आली नाही.

उत्तरकाशीतील सिल्क्यरा येथील बोगद्यात 11 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी बुधवारी रात्री उशिरा पाईप त्यांच्या जवळ पोहोचला होता.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी साधला संवाद –

दिवाळीच्या दिवशी उत्तरकाशीतील निर्माणाधीन बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत अडकलेले 41 कामगार लवकरच बाहेर येऊ शकतात. आज बचावाचा 12 वा दिवस आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आज सिल्क्यरा येथे बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी पोहोचले. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी त्यांनी संवाद साधला.

आत अडकलेल्या गबर सिंग या मजुराशी त्यांनी फोनवर बोलून त्यांना धीर दिला. त्यांनी सांगितले की, येथील संपूर्ण टीम त्यांना पूर्णपणे सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. कामगारांच्या प्रकृतीची विचारपूस करताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांनी आणखी काही काळ मनोधैर्य राखावे. कशाचीही काळजी करू नका. दरम्यान, कामगारांना आज रात्रीपर्यंत बाहेर काढले जाऊ शकते.