लहान मुलांची लस पुढील वर्षीच – अदर पूनावाला

नवी दिल्ली – करोना विरुद्धच्या लढाईत देशात लसीकरण मोहीम राबविली जात असून भारताला आणखी एक लस मिळणार आहे. भारतीय औषध नियंत्रण मंडळाकडे पहिल्या प्रोटीन आधारीत “कोवोव्हॅक्‍स’ लसीच्या आपतकालीन वापराची मंजुरी मागण्यात आली आहे.

भारतात कोवोव्हॅक्‍स लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्‍यता आहे. ऑक्‍टोबर महिन्यात 18 वर्षांवरील नागरिकांना लस उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. तर लहान मुलांना या लसीचे डोस 2022 या वर्षात उपलब्ध होतील, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली.

लसीला मंजुरी मिळाल्यानंतर कोवोव्हॅक्‍सची किंमत सर्वांना कळेल. तर 2022 या वर्षाच्या पहिल्या तिमाहित लहान मुलांसाठी ही लस उपलब्ध होईल, असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले.

कोवोव्हॅक्‍स दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटिश व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर 2020मध्ये नोवाव्हॅक्‍सने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत करार केला होता.

2 बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. भारतात या व्हॅक्‍सिनला मान्यता मिळाल्यानंतर कोवोव्हॅक्‍स नावाने वितरित केली जाणार आहे. ही लस नोवाव्हॅक्‍सने विकसित केली आहे.

करोनावर कोवोव्हॅक्‍स लसीचे दोन डोस प्रभावी असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. अमेरिकेत झालेल्या ट्रायलमध्ये गंभीर संक्रमित रुग्णांवर लस 91 टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मध्यम आणि हलक्‍या स्वरूपाच्या संक्रमणावर 100 टक्‍के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.