वाघोलीत कोविड रुग्णालयासाठी एक एकर जागा देणार

माणिकराव सातव पाटील यांचा निर्धार

वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माणिकराव अमृतराव सातव पाटील यांनी वाघोली येथील स्वमालकीची एक एकर जागा कोविड रुग्णालयाच्या उभारणीसाठी देण्याचा निर्धार केला आहे. सातव पाटील यांच्या दातृत्वाचे हवेली तालुक्‍यात कौतूक होत आहे.

 

येथे नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, ग्रामपंचायत सरपंच वसुंधरा उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच शिवदास उबाळे, सुधीर भाडळे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. बैठकीत वाघोली येथे रुग्णांची वाढती संख्या, रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन खासदार कोल्हे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातव पाटील यांनी स्वमालकीची एक एकर जागा कोविड रुग्णालयासाठी देण्याचा निर्धार व्यक्‍त केला आहे. या जागेत उभारल्या जाणाऱ्या रुग्णालयातून गोरगरिबांची अल्प व माफक दरात सेवा व्हावी, रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे, यासाठी सातव पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सध्या स्पर्धेच्या युगात जो तो व्यावसायिकता जपत असताना सातव पाटील यांनी समाजसमोर आदर्श ठेवत एक एकर जागा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाघोली आणि पंचक्रोशीमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment