शालेय अभ्यासक्रमात “मनुस्मृतीतील श्लोका’वरून वातावरण तापलं; कोण काय म्हणाले वाचा –

Varsha Gaikwad, Sharad Pawar On Manusmriti syllabus – शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्ण भेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार आहे. भाजपाला देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचारांच्या ऱ्हासाची चिंता आहे, म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचे घातक आहे. राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा (SCERT) ने जाहीर केला आहे. यात मनुस्मृतीचा समावेश आहे. हा प्रकार मनुची विभाजनकारी मूल्ये विद्यार्थ्यांच्या निरागस मनावर लादण्याच्या डाव असून काँग्रेसचा याला तीव्र विरोध आहे. अभ्यासक्रम आराखड्यातून हा आक्षेपार्ह भाग काढवा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी शालेय शिक्षण मंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात भग्वद्गीता, मनाचे श्लोक समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करुन देणं आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी गीता आणि मनाचे श्लोक तर मानवी मूल्ये आणि स्वभाववृत्ती यांची ओळख करुन देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादाचा ठरण्याची शक्यता आहे.

भाजपा सरकारवर हल्लोबल करत प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर झालेला महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यात (एससीएफ) मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकाची सुरुवात मनुस्मृतीतील श्लोकाने करण्यात आली आहे. ज्या मनूस्मृतीमुळे वर्णव्यवस्था निर्माण केली, बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप केले, ज्या मनूस्मृतीमध्ये महिलांना समाजात दुय्यम स्थान देण्यात आले आणि ज्या मनुस्मृतीला महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातांनी जाळले त्याच मनुस्मृतीचा अभ्यास शाळेकरी विद्यार्थांनी करायचा का? असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

संविधानातील व्यापक मूलतत्त्वे, सर्वसमावेशकता विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी महाविकास आघाडी सरकारने संवैधानिक शिक्षण अधिक व्यापकपणे शालेय शिक्षणात अंतर्भूत करावे याकरिता प्रक्रिया सुरू केली होती पण मनुवादी सरकारने ती प्रक्रिया थांबवली आणि आता ते मनुची विभाजनकारी मूल्ये विद्यार्थ्यांच्या निरागस मनावर लादण्याच्या तयारीत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपाला संविधान बाजूला सारून देशात मनुस्मृती लागू करायची आहे. सरकारच्या या समाजविरोधी, संविधानविरोधी, विद्यार्थी विरोधी निर्णयाचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहे.

डॉ. मनमोहन सिंह सरकारने आणलेल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार १४ वर्षांपर्यंत प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अबाधित हक्क दिला गेला आहे, त्यांना शाळेतून काढून टाकता येत नाही. मात्र एससीएफमध्ये हा हक्क देखील हिरावून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एखाद्या विद्यार्थ्याने गैरवर्तन केल्यास त्याला शाळेतील प्रवेश रद्द करण्याची किंवा शाळेतून कायमची हकालपट्टी करण्याची अन्यायकारक तरतूद करण्यात आली आहे. यालाही काँग्रेसचा तीव्र विरोध राहील. मविआ सरकार असताना सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली होती मात्र, एससीएफमध्ये त्याबद्दल ही विसंगती दिसून येते. शिवाय इंग्रजी भाषेला ‘परकीय भाषा’ म्हणून वर्गीकरण करण्याचे धोरण देखील विद्यार्थीविरोधी आहे. भाजपा सरकार हे समाजाच्या एकात्मतेला, समतेला आणि लोकशाहीला धोका निर्माण करणारे असल्याने त्यांना धडा शिकवला पाहिजे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
विद्यार्थ्यांना शाळेत मनुस्मृतीमधील श्लोक शिकवण्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षाने टीकेची झोड उठवली होती. या मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्याता आला. त्यांनी त्याला उत्तर देताना म्हटले की, मी असल्या फाल्तू गोष्टींना उत्तर देत नाही. काँग्रेसला हल्लीच्या काळात काहीच उद्योग उरलेले नाहीत. महाराष्ट्रात मनाचे श्लोक वर्षानुवर्षे बोलले जातात, ऐकले जातात. त्यांचा अभ्यासक्रमात समावेश होणार की नाही, याबाबत मला माहिती नाही. पण यावरुन विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

शरद पवार काय म्हणाले ?

राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरु आहे, ही गोष्ट माझ्या कानावर आली. यावरुन राज्य सरकारची संविधानाच्या बाबतीत काय मानसिकता आहे, हे लक्षात येते. त्यामुळे सामजिक संस्थांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मुलांच्या डोक्यात नेमकं काय घालण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे कळत नाही. याबाबत प्रागतिक विचाराचे जे कोणी लोक आहेत, त्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

एससीईआरटीचा अभ्यासक्रम नेमका कसा असणार?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने तिसरी ते बारावी इयत्तेच्या अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यानुसार, भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा, अशी शिफारस एससीईआरटीने केली आहे. तर तिसरी ते पाचवीपर्यंत 1 ते 25 मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्यायाच्या पाठांतरांची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही मानवी मूल्यांची शिकवण देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव आहे.