PMC Bank Scam: ईडी कार्यालयात वर्षा राऊत यांची 3 तासांहून अधिक वेळ चौकशी

मुंबई – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. तीन तासांहून अधिक वेळ त्यांची चौकशी करण्यात आली आहे. वर्षा राऊत यांना ईडीकडून 5 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, वर्षा राऊत एक दिवस अगोदर ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत.

वर्षा राऊत यांना पीएमसी बॅंक प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. पीएमसी बॅंकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना पीएमसी बॅंकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास सांगितले आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.

दरम्यान, पीएमसी बॅंक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

Leave a Comment