#video: राज्यात करोना रुग्णसंख्या वाढली अन् मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर; मास्क वाटत लोकांना दिल्या सूचना

नवी दिल्ली : देशात करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अनेक राज्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून लसीकरण वाढवण्याच्या आणि खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तमिळनाडूमध्येही सक्रिय रुग्णांची वाढली आहे. दरम्यान, करोनाचा धोका पाहता तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे स्वतः रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी  लोकांना मास्क वाटले आणि करोनाचे नियम पाळण्याचा सूचना केल्या.

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी लोकांना खबरदारी घेण्याच्या आणि मास्क घालण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्टॅलिन मंगळवारी मास्कचे वाटप करण्यासाठी त्यांच्या गाडीमधून खाली उतरले आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना मास्कचे वाटप केले. मुख्यमंत्र्यांनी विशेषत: त्यांचा ताफा अशा ठिकाणी थांबवला जिथे लोक त्यांना मास्कशिवाय दिसत होते.

मुख्यमंत्री सचिवालयात जात असताना त्यांना वाटेत मास्क न घातलेले लोक दिसले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या. एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी आठ किमी लांबीच्या मार्गावर अनेक ठिकाणी मध्येमध्ये लोकांना मास्कचे वाटप केले.

लोकांना मास्कचे वाटप करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना करोनाच्या धोक्याबाबत इशारा दिला. यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासोबत राज्याचे आरोग्य मंत्री एमए सुब्रमण्यमही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे वाहन थांबवून मुले व महिलांना मास्कचे वाटप केले. मास्कचे वाटप केल्यानंतर ते लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निघाले.

दरम्यान, सोमवारी चेन्नईमध्ये करोनाच्या १७२८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, त्यानंतर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १० हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या तमिळनाडूत १०,३६४ कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चेन्नईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४,२५९ झाली आहे. तसेच अनेक दिवसांनंतर, कोईम्बतूरमध्ये करोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या १००च्या पुढे गेली आहे आणि नवीन रुग्णांची संख्या १०५ वर पोहोचली आहे. तिरुपूरमध्ये ५२, तर कन्याकुमारीमध्ये ४७ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तामिळनाडूमध्ये करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या २७,५२,८५६ वर पोहोचली आहे. त्याच वेळी, संसर्गामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर राज्यातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३६,७९६ झाली आहे.