पिंपरी | गावजत्रेचे कार्यक्रम आचारसंहितेच्या कचाट्यात

कान्हे,(वार्ताहर) – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामदेवतांच्या जत्रा सुरू झाल्‍या आहेत. सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सार्वजनिक कार्यक्रमावर अनेक निर्बंध आले आहेत. त्यामुळे यात्रेतील खास आकर्षण असलेले तमाशा लावणी कार्यक्रम लावणी कलापथक मनोरंजनच्या कार्यक्रमावर वेळेच्‍या बंधनामुळे गंडांतर आले आहे.

ग्रामीण भागात यात्रेच्या निमित्त लावणीचे कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा अशा मनोरंजनचे कार्यक्रम नेहमीच ठरलेले असतात. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला पाहुण्यांचा पाहुणचार व मनोरंजनाचे कार्यक्रम हे चित्र नेहमीचे असते. त्याच्या जोडीला डॉल्बीचा ठेकाही असतो. या सर्व कार्यक्रमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते.

अनेक तमाशा पार्टी, ऑर्केस्ट्रामधून कलाकारांची वर्षभराची कमाई यात्रे काळात होते. पण कार्यक्रम झालेच नाहीत तर कलावंतांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे

रात्री दहाच्या आत सर्व कार्यक्रम करण्याच्या नियमामुळे लाखो रुपयाचा उचल देऊन कार्यक्रम करायचा कसा असा प्रश्न निर्माण होत आहे. पारंपारिक वाद्य रूढी परंपरा यांना नियमातून सुटून देत असत पण रात्री दहाच्या आत मनोरंजनाचा कार्यक्रम होत असल्याने कार्यक्रम रद्द करण्याची वेळ यात्रा समितीवर येत आहे.

नेत्‍यांची मध्‍यस्‍थीही फोल
इतर वेळी गाव पातळीवर स्थानिक नेते मंडळीच्या विनंतीवरून वेळेचे बंधन आणि आवाजाकडे प्रशासन दुर्लक्ष करते. मात्र आता आचारसंहितेचे कारण पुढे करून प्रशासन नियमावर बोट ठेवत असल्याने यात्रामधील करमणुकीचे कार्यक्रम आचारसंहितेच्या कचाट्यात सापडले आहेत.