नगर | महामार्गाच्या कामामुळे गाव अडचणीत

नगर, (प्रतिनिधी)- तालुक्यातील अरणगाव हे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अडचणीत सापडले आहे. गावाच्या भौगोलिक रचनेचा गांभार्याने अभ्यास न करता सुरू असलेले रस्त्याचे काम गावकऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू लागल्याने अरणगांवमधील ग्रामस्थांसह सरपंचांनी नगरमधील कार्यालयात प्रकल्प संचालकांना ्र निवेदन देत उपोषण सुरू केले आहे.

अरणगावचे सरपंच पोपटराव पुंड, उपसरपंच विठ्ठल दळवी, ग्रामपंचायत सदस्य सतीश दळवी, नाथा शिंदे, बापू शिंदे, ईश्वर फसले, मारूती आमले, अर्जुन पुंड, मयूर जगताप, मुश्ताक सय्यद, बंटी थोरात, बबन करांडे, भाऊ शिंदे, बाबासाहेब कल्हापुरे, राहुल माळवदे, अप्पासाहेब शिंदे, गेणूजी नाट, हरिभाऊ शिंदे, गुलाबराव नाट, बाळासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. आ. लंके यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने प्रकल्प संचालकांना अरणगावला अडचणीचा ठरलेला नॅशनल हायवेचा मार्ग सुधारून गावकऱ्यांना सोयीचा मार्ग करून द्यावा, असे लेखी निवेदन दिले आहे.

नॅशनल हायवेचे काम करताना बसस्टाॅप काढल्याने बससाठी विद्यार्थी, शेतकरी बांधव, गावकरी यांच्यासमोर कोठे उभे रहावे? असा प्रश्न उभा ठाकला आहे. नाट वस्तीजवळ भुयारी मार्ग असणे अत्यंत आवश्यक असताना तो केला जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सोनेवाडी चौक ते अरणगाव चौक दरम्यान दोन्हीही बाजूने सर्व्हिस रोड पाहिजेत. तसेच ड्रेनेजची व्यवस्था पाहिजे. अरणगावचे मतदार ६००० असताना गावाकडे दुर्लक्ष करून नॅशनल हायवेचे काम जोमात चालले असल्याने ग्रामस्थांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचून नॅशनल हायवेकडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. महामार्गाचे काम सुरू असताना संबंधित मार्गावरील गावांना हे महामार्ग अडचणीचे ठरणार नाहीत, याची गांभीर्याने दखल घेतली जावी, अशी मागणी होत आहे.