nagar | ग्रामपंचायतींमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा होणार कार्यान्वित

पारनेर, (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या प्रयत्नातून ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण व समन्वय बैठकीचे सुपा पोलीस स्टेशन येथे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार असल्याचे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे विभागीय अधिकारी राहुल लामखडे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी मार्गदर्शन केले.

ग्रामसुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी ५० रुपये प्रति कुटुंब, प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे. सदर खर्चाची तरतूद १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करणेबाबतचे निर्देश यापूर्वीच जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत.

गेल्या १४ वर्षांत पुणे, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सातारा जिल्ह्यातील ५५०० हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत.

संपूर्ण भारतासाठी वापरता येणाऱ्या या टोल फ्री नंबरवर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्तीकाळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे यामुळे शक्य होते.