nagar | आदेशाचे उल्लघंन झाल्यास परवाना होणार रद्द

नगर, (प्रतिनिधी) – अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी ‘कोरडा दिवस’चा आदेश जारी केला आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व मतमोजणी ४ जूनचा संपूर्ण दिवस कोरडा दिवसाचा (ड्राय डे) आदेश लागू राहणार आहे.

अहमदनगर जिल्हा व जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या इतर जिल्ह्यातील ५ किलोमीटर क्षेत्रासाठी कोरडा दिवस अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या (दारू विक्री दुकान) चा दारू विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. अशा सूचना ही जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी त्यांच्या आदेशात दिल्या आहेत.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाअन्वये व मुंबई दारूबंदी कायदा अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे. दिंडोरी (नाशिक), नाशिक, भिवंडी (ठाणे) या लोकसभा मतदार संघातील मतदानाचा दिवस २० मे २०२४ आहे. बारामती (पुणे), उस्मानाबाद,

माढा (सोलापूर) या लोकसभा मतदार संघातील मतदानाचा दिवस ७ मे असल्यामुळे या मतदार संघाच्या सीमेलगत अहमदनगर जिल्ह्यातील ५ किलोमीटर अंतरावर कोरडा दिवस लागू असल्याचा आदेशही नगर जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. या आदेशानुसार नगर जिल्हा व जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या ५ किलोमीटर अंतरावर सर्व प्रकाराच्या मद्य विक्रीची दुकाने बंद राहतील.

सर्व दारू विक्रेत्यांनी आपले दुकानातील देश व ‍विदेशी, इतर असलेल्या दारूची विक्री मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व मतमोजणी ४ जूनचा संपूर्ण दिवस बंद ठेवावी. असे ही आदेशात नमूद आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, भरारी पथक क्र.१ व क्र.२ यांनी मद्याची विक्री, वाहतूक व दुकाने उघड्या राहणार नाहीत. याबाबत दक्षता घ्यावी. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या (दारू विक्री दुकान) चा दारू विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.