‘व्हायरल इन्फेक्‍शन’चे रुग्ण वाढले

डेंग्यू आणि चिकनगुणिया प्रादुर्भाव सुरूच; पुढील तीन दिवसांत पावसाची शक्‍यता

पुणे – बोचरी थंडी आणि दुपारच्या ढगाळ वातावरणामुळे शहरातील हवामानात बदल झाला असून, हे हवामान नागरिकांचे आरोग्य बिघडवत आहे. मागील दोन दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी, सांधेदुखी यासह संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देताना थंडीच्या वाढत्या कडाक्‍यामुळे लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे.

दिवसभर ढगाळ वातावरण, मध्येच ऊन तर, रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका अशा विचित्र हवामान बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामध्ये लहान मुले आणि वृद्ध व्यक्‍तींना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात घट झाली असून, ढगाळ वातावरणामुळे शहरात पुढील तीन दिवसांत हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. चार महिने पाऊस होऊनही आता अवकाळीमुळे अरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती आहे.

संसर्गजन्य आजारांसोबतच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया आणि व्हायरल इन्फेक्‍शनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच स्वाईन फ्लू पुन्हा डोके वर काढण्याची शक्‍यता आहे. दरम्यान सर्दी, ताप, खोकला आणि डोकेदुखीचा त्रास झाल्यावर काही रूग्ण घरगुती उपाय किंवा “सेल्फ मेडिसिन’ घेतात. मात्र, आठ दिवसांपेक्षा अधिक ताप, सर्दी आणि घशाचा त्रास असेल तर नागरिकांनी तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. स्वाइन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, डायरिया किंवा अन्य आजार असल्यास त्यावर त्वरीत उपचार करणे शक्‍य होईल.

सततच्या हवामान बदलाचा त्रास लहान मुले आणि वृद्धांना अधिक होतो. सर्दी, खोकला, ताप आणि कफ होणे ही लक्षणे लहान मुलांमध्ये अधिक जाणवतात. तर वृद्धांना सांधे-डोकेदुखी आणि थकवा जाणवतो. त्यातच ऋतुमानाचे बदलेले चित्र आरोग्यासाठी धोक्‍याचे ठरत आहे. त्यामुळे या हिवाळ्यात मुलांना स्वच्छ, पूर्ण शरीर झाकेल असे मऊ कपडे घालावेत. या दिवसांत मुलांच्या अंगावर रॅश येण्याची शक्‍यता असते. त्याकडे पालकांचे लक्ष असावे. जेवणामध्ये पौष्टिक पदार्थ असावेत.
– डॉ. सोनाली घोणे, बालरोगतज्ज्ञ

Leave a Comment