व्हायरल व्हिडीओ : कीटकनाशके फवारणीच्या पंपाने वऱ्हाडींना केले सॅनिटाईझ!

गतवर्षी चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हैराण करून सोडलंय. अतिशय संसर्गजन्य असलेल्या या कोरोना विषाणूची आपल्याला कधी, कुठे आणि कोणाकडून बाधा होईल याचा काही नेम नाही. कोरोना प्रसाराच्या याच (अव)गुणांमुळे जोपर्यंत खात्रीशीर उपाय अथवा परिणामकारक लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत ‘दो गज दुरी मास्क है जरुरी’ हेच सूत्र अंगिकारावे लागणार आहे.

असं असलं तरी काही ठिकाणी मात्र कोरोनाबाबत अद्यापही अपेक्षित जनजागृती झालेली दिसत नाही. याचीच प्रचीति देणारा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सदर व्हिडीओ हा एका लग्नसोहळ्यातील असून दृश्यांमध्ये वऱ्हाडी मंडळी लग्नसमारंभासाठी स्टेजसमोर बसल्याचं दिसतंय. अशातच मंचावर मंगलाष्टका सुरु असताना तेथे एक महोदय पाठीवर  पिकांवर कीटकनाशके फवारण्याचा पंप लटकावून अवतरतात. आणि नवं दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या वऱ्हाडी मंडळींचे क्षणार्धात सॅनिटायझरच्या फवाऱ्याने ‘शुद्धीकरण’ करून टाकतात.

नवं दाम्पत्याला शुभार्शिवाद देण्यासाठी विना-मास्क, मांडीला मांडी लावून बसलेल्या वऱ्हाडी मंडळींनाही सॅनिटायझरच्या फवाऱ्याने हायसं वाटल्याने त्यांच्या तोंडून ‘गो-कोरोना-गो’चा मंत्र उच्चारला जातो. आता सॅनिटायझरचा हा असा फवारा मारल्याने अथवा ‘गो-कोरोना-गो’चा नारा दिल्याने कोरोनापासून रक्षण होईल अशी सुतराम शक्यता नाही. यामुळेच स्वतःला व कुटुंबियांना सुरक्षित ठेवायचे असल्यास सामाजिक अंतर राखून कोरोना संबंधीच्या सुरक्षिततेच्या सर्व उपायांचे पालन करणेच शहाणपणाचे ठरेल!  

Leave a Comment