विराट कोहली केवळ विक्रमासाठी खेळतो; न्यूझीलंडचा ‘या’ क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

बेंगळुरू -रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा अव्वल फलंदाज विराट कोहली हा केवळ वैयक्तिक विक्रमांसाठीच खेळतो, संघाच्या विजयासाठी त्याचे प्रयत्न दिसत नाहीत, असा सनसनाटी आरोप न्यूझीलंडचे माजी कसोटीपटू व समालोचक सायमन डुल यांनी केला आहे. कोहलीची गेल्या काही काळापासून मी अनेक सामन्यांतील खेळी पाहिली आहे तसेच त्याचा अभ्यासही केला आहे. त्याला संघाच्या जयपराजयाची काहीही चिंता नसल्याचेच त्याच्या देहबोलीतून समोर येते.

त्याला केवळ वैयक्तिक कामगिरीचीच काळजी असते. आपल्या नावावर मोठ मोठे विक्रम कसे जमा होतील याच काळजीने व त्यासाठीच तो खेळतो असेत दिसून येते, असेही डुल यांनी सांगितले आहे. सोमवारी लखनौ सुपर जायंट्‌स विरुद्धच्या लढतीत 61 धावांवर तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यातूनही हेच स्पष्ट होते की आपले अर्धशतक झाले आता बाकी फलंदाज आहेतच.

आपण पुढाकार घेत कमीत कमी धोका पत्करून फलंदजी करणे आवश्‍यक आहे हे त्याला लक्षातच येत नाही. त्याने थोडा संयम दाखवला असता तर त्याचे शतक तर साकार झालेच असते; परंतु संघाची धावसंख्या जितकी नोंदली गेली त्यापेक्षा किमान 25 ते 30 धावा जास्त दिसल्या असत्या, असेही डुल म्हणाले. 35 चेंडूत अर्धशतक व ते देखील टी-20 क्रिकेटमध्ये मग तो कोहलीच नव्हे, असेही डुल यांनी म्हटले आहे.