रशियाचे अध्यक्ष ‘ब्लादिमीर पुतीन’ यांची मैत्रीण झाली गायब

मॉस्को – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची कथित मैत्रीण आणि त्या देशाची ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलीस्ट अलीना कॅबेइव्हा अचानक गायब झाल्याची बातमी आहे. गेल्या वर्षी तिने जुळ्यांना जन्म दिला होता. त्यानंतर ती प्रकाशझोतात आलीच नसल्याचे वृत्त आहे. तिची ही जुळी मुले पुतीन यांचीच अपत्ये असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. मात्र पुतीन यांनी त्याचा इन्कार केला आहे.

रशियाची पूर्वाश्रमीची जिम्नॅस्ट असलेल्या अलीनाने गेल्या वर्षी मॉस्कोतील एका क्‍लिनिकमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र त्यानंतर अर्थात एप्रिल 2019 पासून तीच्या संदर्भात कोणतीही बातमी नाही व ती कुठे दिसलेली नसल्याचे माध्यमांनी म्हटले आहे.  पुतीन व त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी ल्यूडमिला यांना दोन कन्या असून त्या आता सज्ञान आहेत. अलीनाच्या मुलांचे पिता पुतीनच असल्याच्या बातम्या तिकडच्या माध्यमांनी दिल्या असल्या तरी त्या पुतीन यांनी फेटाळल्या आहेत.

दरम्यान, पुतीन यांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार पुतीन आपले खासगीपण प्रचंड जपतात. त्यांच्या मुली आता तीशीत असल्यातरी आजपर्यंत जगाला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. त्यांचे फोटोही कोणी कधी पाहिलेले नाहीत. त्यामुळे अलीनाच्या मुलांचे पुतीन हेच जर पिता असतील तर त्यांच्या गायब होण्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही.

अलीना ही रशियातील सगळ्यात प्रख्यात जिम्नॅस्ट आहे. ऑलिम्पिकमध्ये तिने दोनदा सुवर्णपदक पटकावले आहे. या शिवाय 14 जागतिक स्पर्धांमध्येही तिने पदकांची कमाई केली आहे. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला होता. ती पुतीन यांच्या पक्षाकडून संसदेवरही गेली होती. 2008 मध्ये तिच्या आणि पुतीन यांच्या संबंधांच्या जोरदार चर्चा प्रथमच रंगल्या होत्या.

Leave a Comment