पुणे | मतदार जनजागृती पदयात्रा: स्वीप कार्यक्रमाअंतर्गत आयोजन

पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, वर्शिप अर्थ फांउडेशन, निवडणूक साक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मतदारांचे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने बालगंधर्व रंगमंदीर ते डेक्कन दरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी अधिकाधिक युवा मतदारांनी मतदान करावे. आपल्या परिसरातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी केले.

मतदान प्रक्रीयेमध्ये अधिकाधिक युवकांना सहभागी करुन मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याच्यादृष्टीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. निवडणूक साक्षरता मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात मतदार नोंदणीच्याअनुषंगाने चांगले काम करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांना प्राधान्याने मतदान करता येणार आहे. आचारसंहिता कालावधीत निवडणुकीच्या अनुषंगाने अनुचित प्रकार घडल्यास त्याविषयी ‘सी-व्हिजिल ॲप’ वर तक्रार नोंदविता येणार आहे. आपल्या मतदारसंघातील उमेदवारांची माहिती ‘केवायसी अप’वर देण्यात येते, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तांबे यांनी दिली.