वाघोली : दखल घेतली तरच ‘एसआरए’चा विचार करू; दगडखाण कामगार नेते रेगे यांची भूमिका

वाघोली (पुणे) – जमीन व हक्‍काच्या घरासाठी वाघोली येथील गट नं.129, 1123, 1419 व 1567 मधील अतिक्रमण धारकांना प्रत्येकी एक गुंठा भूखंड व शासनाच्या विविध योजनेतून घर मिळावे. यासाठी गेली 25 वर्षे शासन स्तरावर संतुलन संस्था पाठपुरावा करीत आहे.

यासाठी असंख्य आंदोलने, प्रशासन स्तरावर बैठका व वेळोवेळी निर्णय घेतले आहेत. केवळ वाघोली महानगर पालिकेत गेले म्हणून एसआरए प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास त्याला आमचा विरोध राहील. तसेच दगडखाण कामगारांच्या सर्व मागण्या विचारात घेतल्या तरच एसआरएचा विचार करू, अशा भूमिकेचे निवेदन आमदार अशोक पवार व एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांना देण्यात आले आहे, अशी माहिती दगडखाण कामगार नेते बी. एम. रेगे यांनी दिली.

यावेळी आमदार अशोक पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये संतुलन संस्थेच्या संचालिका पल्लवी रेगे यांनी कामगारांच्या घरासाठी शासनाबरोबर केलेला संघर्ष व याबाबतचे आजतागायत झालेले शासन निर्णय पाहता प्रत्येक कामगारांना हक्‍काचे घर मिळालेच पाहिजे, असे मत मांडले. कामगार व महिलांनी आपल्या व्यथा कथन केल्या व एसआरएमुळे आमच्यावर अन्याय झाल्यास एसआरएला तीव्र विरोध करू अशा भावना व्यक्‍त केल्या.

यावेळी दगडखाण कामगारांच्या सर्व मागण्या विचारात घेऊन आवश्‍यक असल्यास एसआरएच्या कायद्यात बदल करून प्रत्येकाला हक्‍काचे घर या संतुलनाचा मागणीचा लढा पूर्णत्वास आणण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासन आमदार अशोक पवार यांनी दिले.