वाल्हेकरांनो बुधवारी कोरडा दिवस पाळा; ग्रामप्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

वाल्हे (पुणे) – वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात मागील महिन्यापासून, वातावरणात होत असलेल्या बदलामुळे वाल्हे परिसरात चिकुनगुनिया व डेंग्यूच्या रोगांनी डोके वर काढले होते. वाल्हे गावात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मागील महिन्यात वाल्हे गावातील खाजगी रुग्णालयात डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते.

वातावरणातील बदल व पावसामुळे साचून राहिलेल्या पाण्याच्या मार्फत सर्वत्र चिकुनगुनिया, डेंग्यूच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे डेंग्यू व चिकुनगुनियाच्या साथीत वाढ मागील महिन्यात होताना दिसून येत होती. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.

प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आव्हान आरोग्य व वैद्यकीय विभागापुढे , तसेच ग्रामपंचायत प्रशासनापुढे होते. त्या अनुषंगानेच वाल्हे गावातील, तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील, नागरिकांचे व घरांचे सर्वेक्षण आशा स्वयंसेविका व आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुर्ण करण्यात आला असून, वाल्हे ग्रामपंचायतीने परिसरात धुराडीची फवारणी केली. तसेच परिसरात पावसाने वाढलेल्या गवतावर तनाशक फवारणी केली आहे. ग्रामसुरक्षा यंञणेच्या माध्यमातून नागरिकांची जनजागृती केली जात आहे. अशी माहिती वाल्हे ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, डेंग्यू, चिकुनगुनिया , झीका, या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव डासा मार्फत होत असून, दिवसेंदिवस आजार भयंकर रूप धारण करीत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आठवड्यातील प्रत्येक बुधवारी कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. तरी कृपया कुणीही जास्त दिवसासाठी पाण्याची साठवणूक करू नये. घराच्या छतावर अथवा आजुबाजुला पडलेले टायर, रिकामे फुटके भांडे,ड्रम,प्लास्टिक वस्तू इत्यादी वस्तू मधे जास्त काळ पाणी साठून राहील्याने डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तसेच झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घर, परिसरात स्वच्छता ठेवावी महामार्ग तसेच गॅरेजेसच्या ठिकाणी असलेले निकामी टायर, गरज नसलेले निकामी टायर, नारळाच्या करवंट्या, घराच्या छतावरील भंगार साहित्य, फुलदानी, फ्रीज, कुलर्सच्या ट्रे मध्ये स्वच्छता ठेवावी. तसेच नागरिकांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायत वाल्हे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. डेंग्यू व चिकुनगुणियाचे रुग्ण वाढत आहेत. ही बाब जरी खरी असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता आजूबाजूचा परिसर व फ्रीजच्या पाठीमागे जमा होणारे पाणी काढून टाकावे. असे आवाहन वाल्हे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल खवले, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले आदींनी केले आहे.