कर्जाचा हप्ता कमी करायचाय?

वैयक्‍तिक कर्ज आणि गृहकर्ज या गोष्टी आजकाल साधारण झाल्या आहेत. पैशाची तातडीची गरज भागवण्यासाठी काही जण वैयक्तिक कर्ज तर घराचे स्वप्न साकार करण्यासाठी गृहकर्ज घेतले जाते. मात्र या कर्जाचा बोजा किती सहन करावा लागणार आहे आणि व्याज किती जाणार आहे, याचा विचार केला जात नाही. कारण आपला फोकस ही तातडीची गरज भागवण्यावर असतो. या गरजा भागवताना कळत नकळतपणे खिसा रिकामा होत असतो. म्हणूनच कर्जाच्या हप्ता कसा कमी करता येईल, याबाबत काही टिप्स सांगता येईल.

व्याज आणि अन्य शुल्काची तुलना करा: वैयक्तिक कर्ज असो किंवा गृहकर्ज हे कर्ज घेण्यापूर्वी विविध बॅंका आणि बिगर बॅंक आर्थिक संस्था (एनबीएफसी)च्या व्याजदराची तुलना करा. प्रक्रिया शुल्कातून आपले किती पैसे जात आहेत, याचेही आकलन करा. विविध संकेतस्थळावर व्याजदर आणि शुल्काची माहिती नमूद केलेली असते. त्याचा आढावा घेऊन व्याजात आणि शुल्कात किती बचत करू शकतो, याचा अंदाज येतो.

कालावधीवरून नफा आणि नुकसान: आपण गृहकर्ज घ्या किंवा वैयक्तिक कर्ज घ्या, ज्याचा कालावधी जेवढा अधिक त्याप्रमाणात आपल्याला कमी हप्ता द्यावा लागतो. मात्र कालावधी अधिक असल्याने अधिक व्याज द्यावे लागते. उदा. जर आपण 11 टक्के दराने पाच लाखाचे लोन तीन वर्षासाठी घेत असाल तर त्याचा हप्ता सुमारे 16 हजार 369 रुपये होईल. जर हा कर्जाचा कालावधी पाच वर्षाचा असेल तर त्याचा हप्ता 10 हजार 871 रुपये असेल. कालावधी वाढल्याने हप्त्याचा बोजा कमी झाला, मात्र त्याची दुसरी बाजू पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे. तीन वर्षाच्या काळात आपण एकूण 89 हजार 297 रुपये व्याज भरतो. त्याचवेळी पाच वर्षाचा कालावधी असेल तर व्याजाची रक्कम वाढून ती 1 लाख 52 हजार होते. म्हणून फायदा आणि नुकसान पाहूनच कर्जाचा दिर्घ आणि कमी कालावधी निवडणे गरजेचे आहे.

प्री-पेमेंट/पार्ट पेमेंटचा आधार घ्या : जर आपण वैयक्तिक किंवा गृहकर्ज घेतले असेल आणि त्याच्या हप्त्याचा बोजा कमी करायचा असेल तर त्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे प्री पेमेंट आणि पार्ट पेमेंट. कर्ज सुरू झाल्यावर प्री-पेमेंट जितक्‍या लवकर सुरू कराल तेवढा अधिक फायदा मिळेल. कारण या दोन्ही घटकात सुरवातीच्या वर्षात व्याज अधिक वसूल केले जाते. जर वैयक्तिक कर्ज 3 वर्षाचे असेल आणि पहिल्या काही वर्षात काही पैशाची बचत करून पार्ट पेमेंट करत असाल तर आपल्या हप्त्यात कपात होईल आणि पर्यायाने व्याज कमी जाईल. हाच फॉर्म्यूला गृहकर्जाला देखील लागू होतो. गृहकर्जातून व्याज वाचवण्याचा आणखी एक फॉर्म्यूला आहे. ज्या बॅंकेचे व्याजदर कमी आहे, अशा बॅंकेत कर्ज स्थानांतरित करावे. दुसरे म्हणजे सध्या गृहकर्ज बेसरेटवर आधारित आहे. त्यास एमसीएलआरवर ट्रान्सफर करा. यातून गृहकर्जाच्या हप्त्यावर बोजा कमी होईल.

– मेघना ठक्‍कर

Leave a Comment