महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये 3 दिवस पावसाचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी

Rain In Maharashtra – गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा चांगलाच वाढला होता. अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे. मात्र राज्यातील अनेक भागात उद्यापासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. यात शनिवार ते सोमवार पावसाचे प्रमाण जास्त राहील. सोमवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्टही देण्यात आला. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने आज म्हणजेच शुक्रवारी नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर शनिवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि नांदेड तर खानदेशातली जळगाव, नंदूरबार आणि धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय रविवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड तर खानदेशातील जळगाव, नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

सोमवारी पावसाची तीव्रता वाढणार
दरम्यान, सोमवारी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला. तर खानदेश, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.