उन्हाळ्यात कोणती फळं आरोग्याच्या दृष्टीने हितावह?

उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपल्याला सतत तहान लागते. परिणामी जास्त जेवणही जात नाही. अशा वेळी शरीरात आवश्यक असणा-या प्रोटिन्सची, कॅल्शिअमची, आणि पाण्याची कमतरता जाणवते. मग डोळ्यासमोर अंधारी येणं, लवकर थकून जाणं या गोष्टी होतात. उष्म्यानं लाही लाही होते. अशा वेळी आपल्याला साथ मिळू शकते ती रसरशीत फळांची. काही फळं जास्त रसरशीत नसली तरी त्यांचा फायदा या दिवसांत शरीराला होतो. मग उन्हाळ्यात कोणती फळं आरोग्याच्या दृष्टीने हितावह ठरतात याची ही थोडक्यात माहिती :

कलिंगड :
दिवसभर फिरल्यावर थकलेली भागलेली मंडळी आपली तहान भागवण्यासाठी या कलिंगडाचाच आधार घेतात. कारण कलिंगड मुळातच थंड आणि पाणीदार असल्यानं त्याच्या सेवनानं आपली तहान भागली जाते. यात ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व असतं. याशिवाय बी ६ आणि बी १ ही जीवनसत्त्वं आणि मॅग्नेशिअम आणि पोटॅशियमसारखी खनिजंही भरपूर असतात. कलिंगडाच्या साली अंगावर चोळल्याने त्वचा मुलायम आणि उजळ होते.

आंबा :
आंबा या फळाला ‘फळांचा राजा’ म्हटलं जातं. हा आंबा चाखण्यासाठी सगळेच उन्हाळ्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. त्याच्या चवीप्रमाणे त्याचे गुणधर्मही तितकेच आहेत. भूक वाढवणे हा आंब्याचा प्रमुख गुणधर्म आहे. कैरी गॅलिक अ‍ॅसिडमुळे आंबट लागते. पण जेव्हा कैरीचं रूपांतर आंब्यात होतं तेव्हा तेच अ‍ॅसिड शरीरात गेल्यावर जीवनसत्त्व ‘अ’मध्ये ते परावर्तीत होतं. तसंच आंब्यातून ‘क’ जीवनसत्त्वही मुबलक प्रमाणात मिळतं. आंबा शक्तिवर्धक आणि स्फूर्तिदायी आहे. उपाशी पोटी आंब्याचं सेवन करणं टाळावंच. जास्त सेवन केल्यानं रक्त विकार, बद्धकोष्टता आणि पोटात गॅस तयार होतो. मधुमेह असलेल्यांनी आंबा खाऊ नये. कैरी खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणं टाळावं कारण घसा दुखण्याची शक्यता असते.

आवळा :
आवळा हे फळ बहुगुणी आहे. उन्हाळ्यात सतत पित्त खवळतं. त्यावर उपाय म्हणून आवळ्याचं सरबत प्यावं. कारण आवळा पित्तशामक आहे. आवळ्याचा रस, जिरं आणि खडीसाखर यांचं मिश्रण एकत्र करून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास आम्लपित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. आवळा आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ल्यानं उन्हाळ्यात होणा-या लघवीच्या जळजळीपासून मुक्तता मिळते, तसंच लघवी साफ होते. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा खाल्ल्याने भूक लागते, मन प्रसन्न राहतं आणि शरीरातील मरगळ निघून जाण्यास मदत होते.

खरबूज :
यात व्हिटॅमिन ‘अ’ आणि पोटॅशिअमसारखे खनिज पदार्थ आहेत. याचं सेवन केल्यानं उन्हाचा त्रास कमी होतो. पण याचं अधिक सेवन केल्यानं पोट आणि आतडी कमजोर होतात. तसंच खरबूज खाल्ल्यानंतर किमान दोन ते तीन तास दूध घेणं टाळावं.

जांभूळ :
जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. उन्हाळ्यात होणा-या अतिसाराचा त्रासावर उपाय म्हणून जांभूळ खावं. जांभळातही पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते उन्हाळ्यात उपयुक्त ठरतं. काबरेहायड्रेट, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असल्यामुळे ते अनेक रोगांवर गुणकारी आहे. पण जांभूळ आणि दूध एकाच वेळी पिऊ नये कारण पोटाचे विकार होऊ शकतात. यात वातदोष असल्याने वात असलेल्यांनी शक्यतो टाळावं. हे फळ नेहमी जवणानंतर खावं.

द्राक्ष :
द्राक्ष हे सगळ्यात मस्त फळ. कारण ते फळ खायचं असेल तर त्याला सोलण्याची गरज नसते. द्राक्ष धुतली की पटापटा खाता येतात. लहान आणि मोठेही हे फळ हौसेने खातात. मात्र आता द्राक्ष मिळण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरीही अजून काही प्रमाणात ती मिळतात. या द्राक्षात मुबलक प्रमाणात ग्लुकोज असतं. द्राक्ष खाल्ल्यानं लगेचच ऊर्जा प्राप्त होते. पण दिवसांतून ५० ते ७५ ग्रॅमपेक्षा जास्त द्राक्ष खाऊ नयेत. तसंच उपाशी पोटी खाणं टाळावं.

Leave a Comment