पुणे जिल्हा | पाणी, चारा समस्या जटिल शेतकर्‍यांच्या वरुणराजाकडे नजरा

वडापुरी, (वार्ताहर) – यंदाच्या दुष्काळाचा सामना इंदापूर तालुक्यातील शेतकरी, पशुपालकांना नकोसा झाला आहे. दुष्काळी स्थिती, वाढत्या उन्हामुळे पाणी, चारा समस्या जटिल झाली आहे. कधी एकदा वरुणराजा बरसेल आणि सर्वच समस्यांपासून मुक्तता मिळेल, अशी अपेक्षा बळीराजा, पशुपालक बाळगून आहेत.

पाणी, चारा नसेल तर दुभती जनावरे सांभाळणे अवघड असते. यंदा दुभती जनावरे सांभाळणे अवघड होत असताना भाकड जनावरे विकण्याची वेळ इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर आली आहे. भविष्यात अशीच दुष्काळी स्थिती, चारा, पाणी समस्या असेल तर ग्रामीण भागातील शेतीला जोडधंदा असलेला दुग्धव्यवसायही नामशेष होण्याच्या शक्यता आहे.

अशा वेळी पशुपालक लांब अंतरावर जाऊन चारा खरेदी करून जनावरांची भूक भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. दुभत्या जनावरांना वेळेवर पुरेसा हिरवा चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे लागते. अशावेळी अधिकचे पैसे खर्च करून पशुपालक दुभती जनावरे सांभाळत आहेत.

आडात नाही तर…
भूजलपातळी प्रचंड खालावल्याने पाणीप्रश्‍न जटिल झाला आहे. कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. विहिरी, आडवे-उभे बोअर लावणे यांसारखे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आडात नाही तिथे पोहर्‍यात कुठून येणार अशी अवस्था असल्याने प्रत्येक घटक अडचणींचा सामना करत आहे.