पिंपरी | पिंपरी चिंचवडकरांवर पाणीकपातीचे संकट

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणामधील पाणीसाठा तळाला चालला आहे. त्यातच बाष्पीभवनामुळे त्यामध्ये घट होत असल्याचे चित्र आहे. पवना धरणामध्ये केवळ 28.93 टक्के तर आंद्रा धरणात 35.37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांवर पाणीकपातीचं संकट घोंगावत आहे.

गेल्या वर्षी राज्यात पाऊस कमी झाल्याचा फटका यंदा अनेक जिल्ह्यांना बसत आहे. विविध जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणीकपात केली जात आहे.

असेच संकट आता पिंपरी-चिंचवडकरांवर घोंगावत असून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा होणार्‍या पवना धरणामध्ये केवळ 28.93 टक्के तर आंद्रा धरणात 35.37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर हे पाणी 15 जुलैपर्यंत जपुन वापरावे लागणार आहे.

त्यामुळे शहरवासियांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या अशी स्थिती नसून तूर्तास पाणीकपात होणार नाही असा दावा महापालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

यादरम्यान लोकसभा मतदारसंघातील मतदानावरून सध्यातरी पाणीकपातीचा कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता. पण आता मतदान पार पडले असून आता लवकरच कालवा समितीची बैठक होणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होणार्‍या धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवा खालावत चालला आहे. तर वाढत्या उन्हामुळे होणारे बाष्पीभवनामुळे पुण्यात पाणीकपात अटळ मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवडला आंद्रा पवना या तीन धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येतो. तर सर्वाधिक पाणी हे पवना धरण साखळीतून ओढले जाते. यावरच शहरातील भाग अवलंबून आहे. पण गेल्यावर्षी कमी पडलेल्या पावसामुळे धरण भरलेच नाही. यामुळे 15 जुलैपर्यंत पाण्याच्या काटेकोर वापरावर सध्या नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.

तूर्तास पाणीकपातीचा निर्णय करण्यात आला नसून तसा निर्णय घ्यावा लागलाच तर कोणत्या दिवशी पाणीकपात केली जाईल, याबाबत निर्णय प्रस्तावित नाही. आजमितीला पालिका दोन्ही धरणांतून 600 एमएलडी आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून 20 एमएलडी असे एकूण 620 एमएलडी पाणी उचलत आहे.

उन्हाळ्यामध्ये पाण्याची मागणी जास्त असते; तसेच बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यामध्ये नियोजन करणे तुलनेने आव्हानात्मक आहे

कालवा समिती बैठक
पाणीपुरवठ्याबाबतचे निर्णय जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा समितीच्या बैठकीत घेतले जातात. पिंपरी-चिंचवड शहराच्या बाबतही याच समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. सध्या आचारसंहिता लागू असल्याने समितीची बैठक झालेली नाही.

तर येत्या पंधरा दिवसानंतरच लोकसभा निवडणुकींचा निकाल लागणार असल्याने आचारसंहिता देखील संपेल. यानंतर पालकमंत्री अजित पवार तातडीने कालवा समितीची बैठक घेतील आणि पाणीकपातीबाबत निर्णय होईल असेही बोलले जात आहे.

दररोज 620 एमएलडी पाणीउचल
पवना 28.93 टक्के 520 एमएलडी
आंद्रा 35.37 टक्के 80 एमएलडी