48 तासांनंतर पाणीपुरवठा

पुणे – आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे महापालिकेच्या पद्मावती जलशुद्धीकरण केंद्रात पावसाचे पाणी घुसले होते. त्यामुळे या जलकेंद्रातून तब्बल पाच पुणेकरांना केला जाणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. अखेर हा पुरवठा अवघ्या दोन दिवसांत सुरळीत करण्यात महापालिकेला यश आले आहे. या जलकेंद्रातील मोटारी बदलून तसेच इतर अत्यावश्‍यक कामे करण्यासाठी प्रशासनाने 5 दिवसांचा कालावधी निश्‍चित केला होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी सलग 48 तास काम करत विक्रमी वेळेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची किमया केली आहे.

पावसाचे पाणी शिरल्याने पद्मावती पंपिंग स्टेशनमधून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. धक्‍कादायक बाब म्हणजे पंपिंग स्टेशनमधून ज्या भागात पावसाने कहर माजविला, त्या बिबवेवाडी, कोंढवा, मार्केट यार्ड, धनकवडी, बालाजीनगर, सहकारनगर, अरणेश्‍वर, संपूर्ण सातारा रस्ता परिसरात पाणीपुरवठा केला जातो. या जलकेंद्रात घुसलेल्या पाण्यामुळे तब्बल साडेचार लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करणारे तब्बल 9 लहान मोठे पंप बंद पडले होते. पालिकेकडून शिल्लक असलेले पंप तसेच इतर जलकेंद्राचा आढावा घेऊन त्या ठिकाणचे पंप तातडीनं उपलब्ध करून या जलशुद्धीकरण तसेच वितरण केंद्रातील यंत्रणा शनिवारी सकाळी पुन्हा कार्यान्वित केली.

70 टॅंकरच्या साडेचारशे फेऱ्या
ज्या भागांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला, त्यावर उपाय म्हणून महापालिकेने गेल्या तीन दिवसांपासून सुमारे 70 टॅंकरच्या माध्यमातून तब्बल 450 टॅंकर फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला आहे. ज्या भागात नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले, तसेच ज्या भागात पाण्याची मागणी होती तेथे 24 तास टॅंकर उपलब्ध करून देण्यात आले होते.

पूरग्रस्त भागातील स्वच्छता कामांसह अन्य सुविधा कामे पूर्ववत
पूरग्रस्त परिसरातील स्वच्छता कामे तसेच गाळ, राडारोडा काढणे, औषध फवारणी यासह पाणीपुरवठा आणि वैद्यकीय सुविधा महापालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पूरग्रस्त भागाची अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पाहणी केली. तसेच या परिसरातील स्वच्छता कामांसह अन्य मुलभूत सुविधा कामांचे नियोजन, मनुष्यबळ, मशिनरी याबाबत आवश्‍यक सूचना दिल्या. तसेच कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, यासाठी सर्व पातळ्यांवर सातत्याने नियोजन करून कामे पूर्ण करावेत. याशिवाय मोबाइल व्हॅन मार्फत वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात आली आहे. याशिवाय रविवारीही या भागातील महापालिकेचे दवाखाने सकळी 9 ते 5 या वेळेत सुरू ठेवण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील तळघरातून हायट्रॉन्स मोबाइल वॉटर कंटेनरच्या सहाय्याने पूरग्रस्त भागातील सोसायट्यांमधील तळघरात साचलेले पाणी काढण्यात आले असून, त्याचा निचराही करण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.

Leave a Comment