पुणे जिल्हा | नेतृत्वकला विकसित होण्यासाठी व्यासपीठ हवे -सावंत

भवानीनगर,  (वार्ताहर) –उत्कृष्ट नेतृत्व कला विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये व्यासपीठ मिळवून देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन रेडिओ रागिनी आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणसमारंभ प्रसंगी अविनाश सावंत यांनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयातच नेतृत्व कला, संभाषण आणि व्यासपीठावर बोलण्याची कौशल्य आत्मसात करता यावीत, याकरिता रेडिओ रागिनी या इंटरनेट रेडिओच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटांमध्ये करण्यात आल्याचे रेडिओ रागिणीच्या (इंटरनेट) संचालिका राजश्री आगम यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी बारामती तालुक्यातील शाळांमधून विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. ’पालकांनी विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, विद्यार्थ्यांना अधिकाधिक अनुभव मिळावेत याकरिता वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पालकांनी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. ’ असे मत यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक डॉ. प्रकाश खोत यांनी व्यक्त केले.

या स्पर्धेमध्ये अनुक्रमे पहिली ते चौथी या गटामधून प्रथम- शिवांजली भोसले, महात्मा गांधी बालक मंदिर, द्वितीय- स्वरांजली शिर्के सरस्वती विद्यामंदिर पणदरे, तृतीय – स्वरांजली पवार महात्मा गांधी बालक मंदिर, उत्तेजनार्थ -इर्शिता चव्हाण, विद्या प्रतिष्ठान सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल व शिवन्या तनपुरे यामध्ये विभागून देण्यात आला.

पाचवी ते सातवी या मोठ्या गटामधून प्रथम-अथर्व शिर्के, नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे, द्वितीय – जिया तांबोळी विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय- वैष्णवी कुंभार आर. एन अगरवाल टेक्निकल हायस्कूल, उत्तेजनार्थ- स्वानंद गोखले, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा व विरजा निलाखे, शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर.