पुणे | चार हजार मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- यापूर्वी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी संवेदनशील मतदान केंद्र निश्‍चित करून मतदानाच्या दिवशी तेथे कोणतेही गडबड होऊ नये साठी वेब कास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात होते. परंतु यंदा प्रथमच पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यांची लिंक पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देण्याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाला उपलब्ध असणार आहे.

मतदान केंद्रांवर थेट वॉच ठेवण्यासह बोगस मतदानाला देखील आळा बसवण्याचा प्रयत्न निवडणूक विभाग करत आहे. यामध्ये जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या ८१ लाख२७ हजार १० इतकी आहे. जिल्ह्यात मतदारसंख्या वाढल्याने प्रशासनाने मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ केली असून ही संख्या ८ हजार २१३ इतकी झाली आहे.

संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, अतिसंवेदनशील परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग व्हिडिओ कॅमेरा लावण्यात येणार आहे.

अनुभवावरून निर्णय
मागील निवडणुकींची पार्श्वभूमी पाहता अनेक मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडले आहेत, काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढलेली, दुबार मतदान, मतदान केंद्रावर फेरफार, गोंधळ, भांडणे किंवा वारंवार एकाच मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड होणे, झोपडपट्टी विभाग, दुबार मतदारांची संख्या, तृतीयपंथीयांचा परिसर, गर्दीच्या ठिकाणी असणारे मतदान केंद्र, आदी बाबींचा विचार संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात येतात.