पीएम मोदींनी जलपूजन केलेल्या ‘निळवंडे’ धरणाचा काय आहे इतिहास?

अहमदनगर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदनगर दौऱ्यावर असताना अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे उद्घाटन केले. दरम्यान निळवंडे धरण 53 वर्षांनंतर पूर्णत्वास आले असून या धरणाच्या माध्यमातून जवळपास जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 182 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या धरणामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरुवातील शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतली, येथे त्यांनी पूजा करून आरतीही केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते. साईबाबांच्या दर्शनानंतर मोदी यांनी निळवंडे धरणाची हेलिकाॅप्टरमधून पाहणी केली.

धरणाचे जलपूजण करून डाव्या कालव्याचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 31 मे रोजी कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आज पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डाव्या कालव्याचे लोकार्पण करण्यात आले.

दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प –

निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. हा प्रकल्प तब्बल 53 वर्षांनंतर पूर्णत्वास गेला असून आतापर्यंत एकूण 5700 कोटींचा खर्च झाला आहे. या धरणाच्या कालव्यांच्या माध्यमातून अकोलेसह, सिन्नरच्या काही भागातील गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळ भागातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल.

निळवंडे धरणाचा थोडक्यात इतिहास –

-1970 च्या सुमारास या प्रकल्पाला मान्यता मिळाली.
– दोन गावांनी विरोध दर्शविल्याने हा प्रकल्प बारगळत राहिला.
– 1993 मध्ये निळवंडे परिसरात धरण प्रकल्प कामाला प्रत्यक्षात सुरवात.
– निळवंडे प्रकल्पावर डावा कालवा, उजवा कालवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजना असे चार कालवे आहेत.
– डावा कालवा हा 85 किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अकोलेमधील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि सिन्नर मधील सहा गावे असे एकूण 113 गावांमधील पाणी प्रश्न मिटणार.
– उजवा कालवा हा 97 किलोमीटरचा आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील 69 गावांमधील 20395 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार.