काय आहे यामी गौतमचा सक्सेसमंत्र?

सरते वर्ष यामी गौतमसाठी अत्यंत उत्तम ठरले. वर्षाच्या सुरुवातीलाच तिच्या “उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यापाठोपाठ यामीअभिनित “बाला’ हा चित्रपट शंभर कोटींच्या क्‍लबमध्ये गेला. या यशामुळे यामी सध्या खुश असली तरी तिच्या आयुष्यात एक टप्पा असा होता जेव्हा तिला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत होता.

त्या काळात खूप काही शिकायला मिळालं असं यामी सांगते. ती म्हणते, एक काळ असा होता जेव्हा माझे चित्रपट तिकिट खिडकीवर चालत नव्हते. त्यामुळे माझ्याकडे मला हव्या तशा कोणत्याही ऑफर्सही येत नव्हत्या. पण अशा वेळी पर्याय नसतो. निवडकांमधून निवड करायची असते. मीही तेच करत गेले. त्या काळात मला जाणवलं की आपल्या चांगल्या-वाईटाविषयी आपल्या कुटुंबाइतकं दुसरं कुणीचं विचार करु शकत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात कधीही कुणालाही तुमचा आत्मविश्‍वास खच्चीकरण करण्यापर्यंतची सूट देऊ नका. तिसरी गोष्ट म्हणजे, स्वतःला आणि स्वतःच्या मनाला, मनःस्थितीला सदैव यश आणि अपयश या दोन्हींसाठी तयार ठेवा. नेहमी पुढील कामावर लक्ष ठेवा. या तीन गोष्टींनी मला संयमित ठेवले. अन्यथा, मीही कोलमडून गेले असते. नवोदितांना आणि तिच्या चाहत्यांना यशासाठीचे हे मंत्र देणारी यामी आता “गिनी वेडस्‌ सनी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment