पुणे | युपीआयसंदर्भात तक्रारींसाठी पीएमपीचा व्हॉट्सअप क्रमांक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पीएमपीने प्रवाशांच्या सोयीसाठी युपीआयद्वारे ऑनलाइन तिकीटाची सेवा सुरू केली. मात्र, युपीआयद्वारे पेमेंट करताना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे काही वेळेस वादही होतात. परिणामी युपीआयद्वारे तिकीट काढणाऱ्यांची संख्या घटत आहे.

त्यामुळे पीएमपीने प्रवाशांना ऑनलाइन तिकिटासंदर्भात तक्रारी करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांकाची सोय केली आहे, तसेच तक्रार करण्यासाठी योग्य मार्गदर्शन कण्याच्या सूचना सर्व वाहकांना देण्यात आल्या आहेत.

पीएमपीने प्रवाशांच्या सोयीसाठी सप्टेंबर २०२३ पासून युपीआयद्वारे ऑनलाइन तिकीट काढण्याची सोय सर्व प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार सुरुवातीला प्रवाशांचा युपीआयद्वारे तिकीट काढण्यास प्रतिसाद कमी होता. मात्र, तो हळूहळू वाढत होता. महिन्याला साधारण पाच लाखांपेक्षा जास्त प्रवासी युपीआयद्वारे तिकीट काढत होते; परंतु गेल्या महिन्यात पुन्हा युपीआद्वारे तिकीट काढणाऱ्यांचा आकडा कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

याशिवाय युपीआयद्वारे तिकीट काढणाऱ्यांच्या तक्रारी देखील वाढत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन पेमेंट करूनही तिकीट न मिळणे, तिकिटाचे पैसे देताना अडचणी येणे, अशा तक्रारींचा समावेश आहे. गेल्या सहा महिन्यांत ऑनलाईन तिकिटासंदर्भात तीन हजार ५६१ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी ९५ टक्के तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत.

हेल्पलाइनवर तक्रारीचे आवाहन
युपीआय यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी पीएमपीकडून काम सुरू आहे. एखाद्या प्रवाशाने तिकीट काढताना पेमेंट यशस्वी होऊन तिकीट न आल्यास पीएमपीच्या हेल्पलाइनवर तक्रार करण्यास सांगावे, तसेच ९८८१४९५५८९ या व्हॉट्सअप क्रमांकावर पैसे कमी झाल्याचा आरआरएन क्रमांकाचा फोटो पाठविण्यास सांगावे.

या तक्रारीनुसार प्रवाशांची तक्रार तात्काळ सोडविण्यासाठी मदत केली जाईल. वाहनांना देखील परत एकदा तिकिटाचे पेमेंट पडताळून पाहण्यासाठी रिचेक पेमेंट स्टेटस अशी स्वतंत्र बटनची तिकीट मशीनवर सोय केली जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन तिकिटाच्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.