पुणे “अनलॉक”बाबत निर्णय कधी?

पुणे – करोना रुग्णांची घटती संख्या लक्षात घेऊन शासनाने स्वातंत्र्यदिनापासून राज्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हॉटेल, मॉल दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, पुण्यात महापालिकेच्या आदेशानुसार ही वेळ अजूनही रात्री 8 पर्यंत आहे. पुणे महापालिकेकडून अद्याप शासनाच्या निर्णयनुसार सुधारित आदेश काढलेले नाहीत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनापासून निर्बंध आणखी शिथिल करण्याची घोषणा केल्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाने लॉकडाऊनबाबतचे सुधारित आदेश जाहीर केले. त्यानुसार राज्यात आता रात्री 10 पर्यंत हॉटेल, मॉल, रेस्टॉरंट, जिम, उपहारगृहे सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.

शासनाने याबाबतचे आदेश 11 ऑगस्ट रोजी काढले आहेत. त्यानंतर दोन दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप महापालिका प्रशासनाने या आदेशानुसार शहरासाठी सुधारित आदेश काढलेले नाहीत. परिणामी, शहरात अद्यापही मागील आदेशाच लागू आहेत. त्यानुसार वरील सुविधा रात्री 8 पर्यंतच असणार असतील, तर लोकल प्रवासालाही मुभा नाही. त्यातच शनिवार ते सोमवारपर्यंत महापालिकेस सलग तीन दिवस सुट्टी असल्याने महापालिका या बाबतचे आदेश कधी काढणार, याबाबत संभ्रमावस्था आहे. तर पालिकेने हे आदेश शनिवारी न काढल्यास शासनच्या शिथिलतेचा लाभ पुण्यातील व्यावसायिक तसेच व्यापाऱ्यांना मिळणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.