क्रिकेट कॉर्नर : पंचांची कामगिरी सुधारणार कधी ?

-अमित डोंगरे

करोनाचा धोका कायम असल्याने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याज्या देशात सामने होत आहेत, त्याच देशाचे पॅनेल पंच नियुक्त केले जात आहेत. करोनामुळे तसेच विलगीकरणाच्या कठोर नियमांमुळे परदेशातील पंच तसेच सामनाधिकारी हवाई प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे भारत व इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटीतसेच एकदिवसीय व टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय पंच तसेच सामनाधिकारी यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. पण एक गोष्ट समजत ती म्हणजे ज्या पंचांना ही जबाबदारी दिली गेली आहे त्यांच्या कामगिरीचा निकष काय व कोणता. केवळ त्यांना बीसीसीआयने पॅनेल पंच म्हणून मान्यता दिली आहे हा निकष आहे का त्यांच्यावर कोणाचा तरी वरदहस्त आहे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

पहिल्या कसोटीत बेन स्टोक्‍स, डॉमनिक सिबली यांच्याबाबत त्यांनी दिलेले निर्णय पाहिल्यावर असे वाटले की भारतीय पंचांना सुधारणा करण्यास मोठा वाव आहे. त्या सामन्यात नितिन मेनन व अनील चौधरी यांची प्रमुख पंच म्हणून नियुक्ती झाली होती. या सामन्यात मेनन यांच्याबरोबर वीरेंद्र शर्मा हे पंच आहेत तर चौधरी तिसरे पंच म्हणून काम करत आहेत. खरेतर बीसीसीआयच्या पॅनेलवर पंच नियुक्त होत असताना त्यांच्या प्रथम दर्जाच्या कामगिरीचा तसेच त्यांच्या क्रिकेटच्या नियमांच्या ज्ञानाची कठोर परिक्षा घेतली जाते. कसोटी व एकदिवसीय सामन्यांसाठी प्रमुख पंच म्हणून आयसीसीच्या पॅनेलवरील पंच नेमले जातात व स्थानिक पंच त्यांचे सहकारी असतात. इतक्‍या मोठ्या स्तरावर पंच म्हणून काम करण्याची मिळालेली संधी या सगळ्यांनी वाया घालवली असेच म्हणावे लागेल. 

चेन्नईच्याच मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरू झाला व भारताच्या पहिल्या डावातील दीडशतकवीर रोहित शर्मा याच्याबाबतचा डीआरएस पंचांनी कोणत्या निकषावर घेतला याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. रोहितविरुद्धचे अपिल फेटाळले गेल्यावर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने डीआरएस मागितला पण तो पर्यंत वेळ संपलेली होती. तरीही पंचांनी डीआरएस घेतला. पहिल्या डावात ऑलिव्हर स्टोनने कुलदीप यादवला बाद केले तेव्हा फोक्‍सने झेल घेतला होता पण रिप्लेमध्ये हा चेंडू चक्क नो-बॉल असल्याचे स्पष्टपणे दिसले होते मग पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत का घेतली नाही. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांत संपला पण याही डावात पंचांनी डॉनियल लॉरेन्सविरुद्धचे झेलबादचे अपील फेटाळले होते. स्वतः लॉरेन्सलाही आश्‍चर्य वाटल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. 

पंच मेनन यांच्याकडून अशा चूका अनेकदा घडलेल्या आहेत. आयपीएल स्पर्धेतही त्यांच्या अनेक निर्णयांवर खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. ही मालिका खरेतर मेनन यांच्यासह नियुक्त झालेल्या सगळ्याच पंचांसाठी आयसीसी पॅनेलचे दार ठोठावण्याची सुवर्णसंधी होती पण तीच त्यांनी वाया घालवली आहे. सलामीवीर शुभमन गिलला पायचित बाद देणे व अजिंक्‍य रहाणेला झेलबाद देण्याचे निर्णय काहीसे शंकास्पद वाटले. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर नियुक्ती करण्यापूर्वीचे निकष आणखी कठोर केले गेले पाहिजेत असे वाटते. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्णय अत्यंत योग्य मिळावे यासाठी पंचांच्याही निर्णयाला आव्हान दिले जाऊ लागले आहे. पंचांना द सोल जज म्हणले जाते. काळ बदलला आहे तंत्रज्ञान आले आहे, मग पंचांच्या कामगिरीत कशी सुधारणा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे अन्यथा त्यांनी दिलेला एक चुकीचा निर्णय एखाद्या संघाचे संपूर्ण वर्चस्व उद्‌ध्वस्त करु शकतो.

Leave a Comment