नालेसफाईचा पैसा मुरतोय कुठे?

तासाभराचा पाऊस उडवतोय पालिकेची झोप

पुणे – तब्बल 450 किलोमीटरच्या पावसाळी जलवाहिन्या, तेवढ्याच लांबीचे नाले आणि जवळपास 900 किलोमीटरहून अधिक लांबीच्या ड्रेनेज लाइन असून शहराला अवघ्या 50 मिमी पावसातही पुराचा सामना करावा लागत असल्याचे गेल्या दोन दिवसांपासून समोर आले आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी दरवर्षी जवळपास 100 कोटी नाले सफाईवर आणि 30 ते 40 कोटी वाहिन्यांच्या साफसफाईवर खर्च करत असताना शहर तुंबत असल्याने हा पैसा नेमका कुठे जातो, असा प्रश्‍न आहे.

गेल्या दशकभराच्या तुलनेत यंदा शहरात तब्बल 110 टक्के पाऊस झाला आहे. या पावसात सातत्य असले, तरी शहरात अवघ्या काही तासांत 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस पडण्याचे प्रकार या पावसाळ्यात तीन ते चार वेळा घडले आहेत. त्यामुळे शहराच्या बहुतांश भागाला अचानक आलेल्या पुराचा सामना करावा लागला आहे. ही स्थिती शहराच्या चारही दिशांना उद्‌भवली आहे. मात्र, या पुराचे खापर महापालिकेकडून एकाच वेळी पडलेल्या पावसावर फोडण्यात आले.

तर या पावसाचे प्रमाण अधिक असल्याने ही स्थिती उद्‌भवल्याचे सांगत हात वर केले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा अचानक सुरू झालेल्या पावसाने महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात 40 ते 50 मिमी पाऊस झाल्यानंतरही रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी साचत आहे. त्यामुळे शहरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीची यंत्रणा कुठे गायब झाली, असा प्रश्‍न विचारला जात आहे. प्रमुख्याने ज्या रस्त्यांवर दोन्ही बाजूस नव्याने पदपथ तयार केले आहेत, तेथे हे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणाच महापालिकेने न ठेवल्याने ही स्थिती उद्‌भवली आहे.

Leave a Comment