‘ईव्ही बॅटरी’चा कचरा टाकायचा तरी कोठे? फेरवापर, विल्हेवाट याबाबत धोरणच नाही

पुणे – शहरात इलेक्‍ट्रिक वाहनांची (ईव्ही) संख्या वाढत असताना, ई-कचऱ्याचे आणखी एक प्रकार असलेल्या ईव्ही बॅटरी कचरा आणि त्याची विल्हेवाट यावर तज्ज्ञ चिंता व्यक्‍त करीत आहेत. भविष्यात अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी मात्र पुणे पालिकेकडे कोणतेही धोरण नसल्याचे अधिकारी खासगीत सांगत असून, त्यासाठी केंद्र सरकारकडून काहीतरी नियमावली यावी याची ते प्रतीक्षा करत आहेत.

पुणे शहरात ई-कचरा निर्मितीचे प्रमाण वाढत आहे. आकडेवारीनुसार, सन जुलै 2023 पर्यंत तब्बल 21,900 किलो कचरा निर्माण झाला; जो 2023 मध्ये “स्वच्छ’द्वारे गोळा केलेल्या एकूण कचऱ्याच्या सुमारे 14 टक्‍के होता. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या मोहिमेच्या जवळपास 50 टक्‍के आहे आणि ऑक्‍टोबरनंतर ही संख्या वाढण्याची शक्‍यता आहे, स्वच्छ संस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पुणे आरटीओच्या आकडेवारीनुसार शहरात चारचाकी आणि दुचाकी मिळून इलेक्‍ट्रिक वाहनांची संख्या सुमारे 57 हजार आहे.

“सध्याच्या नवीन तंत्रज्ञानामुळे ईव्हीची बॅटरी पाच ते सहा वर्षे चांगली चालू शकते; परंतु आम्ही ईव्ही बॅटरी ई-कचऱ्याच्या भविष्यातील शक्‍यतांचाही विचार करत आहोत,’ अशी माहिती महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी दिली. “आम्ही “स्वच्छ’ संस्थेमध्ये “व्ही कलेक्‍शन’ नावाची कचरा संकलन मोहीम राबवतो, ज्याद्वारे ई-कचऱ्यासह विविध कचरा गोळा केला जातो. नंतर आमच्या सुविधांवर त्याचे विलगीकरण केले जाते आणि ई-कचरा हा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील नोंदणीकृत रिसायकलर्सकडे सुपूर्द केला जाईल,’ असे स्वच्छ संस्थेचे संचालक हर्षद बर्डे म्हणाले.

“अलीकडच्या वर्षांत आम्ही ई-कचरा निर्मितीमध्ये वाढत्या प्रकाराचा अनुभव घेत आहोत. सन 2022 मध्ये, ई-कचरा संकलनाची संख्या तुलनेने कमी असेल कारण कलेक्‍शन ड्राइव्हची संख्या काही प्रमाणात कमी होती, तथापि, आपण पाहिल्यास, सन 2023 मध्ये जुलैपर्यंत जमा झालेल्या कचऱ्याचे प्रमाण सुमारे निम्मे आहे. दिवाळीनंतर ही मोहीम अधिक असेल,’ असे बर्डे यांनी सांगितले.

“युज अँड थ्रो’ पॅटर्नमुळे अधिक ई-कचरा निर्माण होऊ शकतो. यापूर्वी खूप जुन्या किंवा वापरात नसलेल्या वस्तू नागरिकांकडून कचऱ्यात टाकल्या जात होत्या. तथापि, अलीकडेच एका नवीन निरीक्षणाने सूचित केले आहे, की तुलनेने नवीन असलेल्या आणि वापरण्यासाठी चांगल्या असलेल्या गोष्टीदेखील कचऱ्यामध्ये टाकल्या जात आहेत. ई-कचऱ्याच्या वापरा आणि फेकण्याच्या पद्धतीमुळे ई-कचऱ्याची निर्मितीही वाढली. – हर्षद बर्डे, संचालक, “स्वच्छ’

व्ही कलेक्‍ट ड्राइव्हद्वारे संकलित ई-कचऱ्याचा तपशील
वर्ष           किलोमध्ये              टनांमध्ये
2021         52,398                 52.0
2022        42,933                   42.9
2023        21,900 (जुलैपर्यंत)    21.9

पालिकेची अपेक्षा

  • वाहनांची वापरलेली बॅटरी परत घेणे आणि त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी उत्पादकांनी घेणे आवश्‍यक
  • नवीन तंत्रज्ञानामुळे बॅटरी पुन्हा वापरण्यासाठी चालना मिळू शकते.
  • बॅटरीचा वापर विविध पद्धतींद्वारे अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. उदा. प्लॅस्टिकच्या मदतीने भांडी आणि विविध साचे यासारख्या विविध गोष्टी विकसित केल्या जात आहेत.