सातारा | जिथे येळगावकर तिथे पराभव – सुरेंद्र गुदगे

मायणी – कोणत्याही निवडणुकीत जिथे येळगावकर असतील तो उमेदवार पराभूत होतो, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केली. मायणी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. श्री. गुदगे म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. येळगावकर यांनी प्रभाकर देशमुख यांचे काम केले. त्यामुळे प्रभाकर देशमुख यांचा निसटता पराभव झाला.

आता लोकसभा निवडणुकीत डॉ. येळगावकरांनी रणजितसिंह निंबाळकरांचे काम केले तर त्यांचा पराभव झाला. त्यामुळे येळगावकर व हार हे समीकरण बनले आहे. त्यामुळे नेत्यांनी यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवूनच राहवे. अन्यथा अपघात अटळ आहे.

खटाव माण मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळाले. खटाव तालुक्यात सहा हजार व विशेषतः मायणी गटामध्ये दोन हजार मताधिक्य मिळाले, म्हणून येळगावकर उर बडवून घेत आहेत. परंतु, सर्वांना माहिती आहे हे मताधिक्य कसे मिळाले आहे ते. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रोखलेला भाजपचा वारू वाखाणण्यायोग्य आहे. माळशिरसची आघाडी खटाव- माणमध्ये तोडणार व सर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार आमच्यासोबत असल्याने मोठे मताधिक्य घेणार अशा वल्गना फेल ठरल्या आहेत.

उलट खटाव, माण, फलटणमध्ये मोहिते पाटील यांचे होणारे ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात आघाडीचे कार्यकर्ते यशस्वी झाले. त्यामुळे सव्वा लाखांच्या फरकाने धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला उमेदवारच नाही अशी परिस्थिती निवडणुकीपूर्वी असताना खटाव, माण, फलटणच्या आघाडीच्या कार्यकत्यांनी उमेदवार देण्यात व निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे येळगावकर यांनी उगाच उर बडवून घेऊ नये. प्रसिध्दी स्टंट करून भाजपचे जिल्हाध्यक्षपद पदरात पडते का, तेच त्यांनी पाहवे, अशी टीका त्यांनी केली.