“महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते, तेथेच संथ गतीने मतदान”; संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut|  लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी सोमवारी पार पडेल. यात राज्यातील 13 मतरदार संघाचा समावेश होता. यातील मुंबईमधील काही मतदान केंद्रावर अतिशय संथपणे मतदान होत असल्याची तक्रार करत नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवर संशय व्यक्त करत

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. मुंबई, ठाणे, कल्याणसह १३ लोकसभेच्या जागांसाठी हे मतदान झाले. या मतदानादरम्यान अत्यंत संथ गतीने यंत्रणांनी काम केल्याने मुंबईकर नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावरुनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह, केंद्र सरकारवर संशय व्यक्त केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“शिवसेनेला ज्या ठिकाणी भरघोस मतदान होऊ शकेल तिथंच कासवगतीने यंत्रणा चालू होती. विशेषता जिथे महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते तेथील बुथ विधानसभा क्षेत्र, लोकसभा संघात जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल अशी कोणती स्ट्रॅटर्जी निर्माण केली का असा प्रश्न निर्माण झाला आहे,” अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली.

“जिथे महाविकास आघाडीची सरशी होईल अशा ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवून ठेवण्यात आले होते. एका मतदाराला दहा ते पंधरा मिनिटं लागत असल्याचे उघडकीस आले आहे. मुंब्रातील एका मतदारसंघांमध्ये एका तासांमध्ये फक्त 11 लोकांनीच मतदान केले. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत होते, त्यांच्यामध्ये प्रभावाची भीती आहे हे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनामध्ये आणले आहे. पण १३ ही ठिकाणी भाजपच्या आणि मित्र पक्षांचा पराभव होणार याची खात्री असल्याने शेवटचा डाव टाकण्यात आला. तरीही माझी खात्री आहे की इंडिया आघाडीच जिंकणार”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“आम्ही जागृत होतो त्यामुळे त्यांना ईव्हीएम हॅक करता आले नाहीत, पैसे वाटप आम्ही पकडलं, मग काय करायचं? मग अशा पद्धतीने यंत्रणा ढिली करायची. लोकांचा छळ करायचा. चार-चार तास लोकांना रांगेत उभं करायचं. ही डिजिटल इंडिया आहे ना? याचा अर्थ मोदींचं डिजिटल इंडिया फेल गेले,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.