T20 World Cup 2024 : मोहम्मद आमिरला कोणत्या भारतीय फलंदाजाची वाटते भिती? IND vs PAK सामन्यापूर्वी नाव केलं उघड…

T20 World Cup 2024 (IND vs PAK) : टी-20 विश्वचषकाच्या 11व्या सामन्यात गुरूवारी पाकिस्तानचा सामना यजमान अमेरिकेशी झाला. हा गट-अ सामना डलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतील पहिला मोठा उलटफेर अमेरिकेने घडवला आहे. त्यांनी अ गटातील सामन्यात 2009 च्या चॅम्पियन पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे.

2024 च्या टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानचा हा पहिलाच सामना होता आणि त्यातच त्यांना त्यांच्यापेक्षा खूपच कमकुवत असलेल्या अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आता या रविवारी, 9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात T20 विश्वचषक 2024 चा महान सामना रंगणार आहे. नॅसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे रात्री 8 वाजल्यापासून या सामन्यात दोन्ही संघ भिडतील. या महान सामन्यापूर्वी पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने टीम इंडियाच्या त्या फलंदाजाचे नाव उघड केले आहे ज्याच्या विरुद्ध गोलंदाजी करताना त्याला भिती वाटते.

कोणत्या फलंदाजाला घाबरतो मोहम्मद आमिर ?

मोहम्मद आमिर स्टार स्पोर्ट्सवरील मुलाखतीत म्हणाला, “रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. जेव्हा तो खेळपट्टीवर सेट होतो तेव्हा त्याला गोलंदाजी करणे खूप भितीदायक होते . कारण सेट झाल्यावर त्याच्याइतका धोकादायक फटकेबाजी करणारा फलंदाज कोणीच नाही. तो सर्वोत्कृष्टांपैकी एक आहे. ”

T20 World Cup 2024 : टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव…

दरम्यान, टी-20 विश्वचषक 2024 च्या आठव्या सामन्यात बुधवारी भारताचा सामना अ गटात आयर्लंडशी झाला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियानं आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव आहे. यासह 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयाने सुरुवात केली आहे. प्रथम खेळताना आयर्लंडने केवळ 96 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 12.2 व्या षटकात दोन गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 37 चेंडूत सर्वाधइक 52 धावांची खेळी केली. रोहितने आपल्या खेळीत 4 चौकार अन् 3 षटकार लगावले.