‘व्हॉइट कॉलर’ गुन्हे गंभीर स्वरुपाचे; पुणे न्यायालयाचे निरीक्षण

  • अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला

पुणे-  आर्थिक मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून दीड कोटी रुपये घेऊन फसवणूक केलेल्या प्रकरणातील एकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. “देशाच्या विकासासाठी आर्थिक प्रगती महत्त्वाची आहे. मात्र, अशा प्रकारे फसवणूक करुन केले जाणारे व्हॉइट कॉलर गुन्हे गंभीर स्वरुपाचे असून, आरोपीला जामीन देता येणार नाही,’ असे नमूद अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी हा आदेश दिला.

 

पंकज पांडे असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी जामिनास विरोध केला. फिर्यादीतर्फे ऍड. धैर्यशील पाटील यांनी त्यांना सहाय केले. “फिर्यादीला 25 कोटींची आर्थिक गरज होती. त्यामुळे पंकज पांडे व जयंत गायकवाड यांच्यामार्फत त्याने अल मदिना बिझनेस सोल्युशन्स या प्रायव्हेट फंडिंगच्या व्यक्तीला म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपीला भेटून आर्थिक मदतीची मागणी केली.

 

फिर्यादीला सहा महिन्यांचे आगाऊ हप्ते दीड कोटी रुपये दिल्यास उर्वरित 23 कोटी लगेच देण्याचे आश्वासन देण्यात आले. दीड कोटी रुपये देऊनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन, पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केला असता असे आढळून आले की, फिर्यादीची फसवणूक करण्यात आली आहे.

 

खडक पोलिसांचे तपास पथक चेन्नईला गेले असता त्यांना एकही आरोपी मिळाला नाही. पोलिसांनी आरोपींची सर्व बॅंक खाते गोठवली असून, अधिक तपास सुरू आहे, त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा,’ असा युक्तीवाद सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला. फिर्यादीतर्फे ऍड. धैर्यशील पाटील यांनी त्यांना सहाय्य केले.

Leave a Comment