चारचौघात कंगनाच्या कानशिलात लगावणारी कुलविंदर नेमकी कोण ? दोन लहान मुले; पतीदेखील CISF जवान, वाचा….

Kangana Ranaut : कपूरथला बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचलमधून निवडून आलेली खासदार कंगना रणौत हिला चंदिगड विमानतळावर सीआयएसएफ महिला कर्मचारी कुलविंदर कौर हिच्याकडून कानशिलात लगाविण्यात आली. त्यानंतर कुलविंदरला आता ताब्यात घेण्यात आले आहे. कंगनाच्या शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्यावर महिला कर्मचारी संतापल्याचे सांगण्यात येते.

कुलविंदर कौर ही पंजाबमधील कपूरथला येथील रहिवासी आहे. कुलविंदर कौरचा विवाह 6 वर्षांपूर्वी जम्मूमध्ये झाला होता. तिचा पतीही सीआयएसएफमध्ये आहे. कुलविंदरला 2 मुले आहेत. मुलगी 6 ते 7 वर्षांची आणि मुलगा 5 ते 6 वर्षांचा आहे. ती अडीच वर्षे चंदीगडमध्ये तैनात होती.

कुलविंदरचा भाऊ शेर सिंग याने सांगितले की, त्यांना बातमीवरूनच घटनेची माहिती मिळाली. आम्ही तिच्याशी बोललेलो नाही. तिच्याशी बोलल्याशिवाय आम्ही या घटनेवर काही बोलू शकत नाही.

शेर पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे चुकीचे नाही. शेतकरी देशासाठी लढत आहेत. मी स्वतः किसान मजदूर संघर्ष समितीशी संबंधित आहे.

कुलविंदर माझ्यापेक्षा लहान आहे. 16 वर्षांपासून ती सेवा देत आहे. तिची यापूर्वी केरळ, चेन्नई आणि अमृतसर येथे पोस्टिंग झाली आहे. त्यामुळे यापूर्वी तिने कधीच कोणाशी गैरकृत्य केलेले नाही.

कुटूंब कुलविंदरसोबत
आम्हाला समजले की ही घटना सुरक्षेमुळे घडली आहे. कुलविंदर स्कॅनरवर ड्युटीवर होती, जिथे बॅग, पर्स आणि मोबाईल तपासले जातात. येथे कंगनाने ती खासदार असल्याचे सांगितले. त्यावर कुलविंदरने तिला उत्तर दिले.

यावरूनच दोघींमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यामुळे घडलेल्या घटनेला कंगनाही जबाबदार आहे. तसेच, कंगनाने यापूर्वी आमच्या लढाईबद्दल अज्ञानातून अनेक चुकीची वक्तव्य केली आहेत. त्यामुळे या घटनेत कौर कुटूंब कुलविंदरच्या पाठीशी आहे.