मध्य प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? भाजपच्या १६३ नवनिर्वाचित आमदारांची होणार बैठक

भोपाळ  – मध्य प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावरील सस्पेन्स सोमवारी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सोमवारी भाजपच्या १६३नवनिर्वाचित आमदारांची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात नेत्याची निवड होईल, असे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

या बैठकीसाठी भाजपने शुक्रवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची मुख्य केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या खेरीज अन्य दोन निरीक्षकही त्यांच्या मदतीला देण्यात आले आहेत. सोमवारी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत ही बैठक सुरू होण्याची शक्यता आहे, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी ही बैठक रविवारी होणार होती, मात्र निरीक्षकांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ती सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे निरीक्षक रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी मध्य प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

गेल्या १९ वर्षात भाजपने मध्य प्रदेशात केंद्रीय निरीक्षक पाठवण्याची ही तिसरी वेळ आहे. ऑगस्ट २००४ मध्ये, उमा भारती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि अरुण जेटली यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून राज्यात पाठवण्यात आले होते.

नोव्हेंबर २००५ मध्ये, जेव्हा बाबूलाल गौर यांनी राज्यातील सर्वोच्च पदाचा राजीनामा दिला, तेव्हा नवीन मुख्यमंत्री निवडण्यात आमदारांना मदत करण्यासाठी राजनाथ सिंह यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले.

त्यावेळी शिवराज सिंह चौहान यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. यावेळी, भाजपने विद्यमान मुख्यमंत्री चौहान यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून प्रोजेक्ट न करता विधानसभा निवडणूक लढवली होती.