पुणे जिल्हा | शिरूरचा गुलाल कोण उधळणार

नारायणगाव, {मंगेश रत्नाकर} – शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाप्रक्रिया पार पडली असली तरी शिरूरचा लोकसभा मतदारसंघात कोण गुलाल उधाळणार याकडे जुन्नरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसभा निवडणूक जरी शिरूर मतदारसंघाची असली तरी निवडणुकीतील मुख्य दोन प्रतिस्पर्धी उमेदवार शेजारील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील असल्याने निवडणुकीत मोठी रंगत चढली होती. निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती.

परंतु महायुतीने शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रचारातील रंगत वाढू लागली. आणि शिरूर लोकसभेचे चित्र हळूहळू बदलू लागले होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार करीत असताना डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर अधिक भर दिला. तसेच केंद्रातील सरकारवर हल्लाबोल करून शिरूर लोकसभा मतदारसंघात आव्हान निर्माण केले. शिवाय सोबतीला राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांची भावनिकतेची लाट होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे डॉ.कोल्हे यांना निवडणूक सुकर होईल असे चित्र निर्माण झाले होते.

परंतु महायुतीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पाटील यांनी पंतप्रधान मोदींनी केलेली विकासाची कामे, मतदारसंघातील डॉ. कोल्हे यांची अनुपस्थिती, विकासकामे काही नाही या मुद्द्यांवर भर देऊन प्रचारातील रंगत वाढवली.

याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या सहा आमदारांपैकी पाच आमदार आढळराव पाटील यांच्या बरोबर असल्याने अंतिम क्षणी लोकसभा निवडणुकीतील चुरस निर्माण केली.

दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक
शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टप्पा सोमवारी (दि.13) पार पडल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील गटाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाची खात्री जरी व्यक्त करण्यात आली असली तरी मतदानाची टक्केवारी घसरल्याने दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या मनात विजयाचा गुलाल नेमकी कोण उधळणार, अशी धाकधूक निर्माण झालेली दिसून येत आहे.

शेवटच्या टप्प्यात चित्र बदलले
डॉ. अमोल कोल्हे यांचे जुन्नर तालुका होम ग्राउंड असल्यामुळे निवडणूक एकातर्फी होईल असे वाटत होते. एव्हाना तसे चित्र निर्माण करण्यात आले होते. परंतु निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसे निवडणुकीचे वातावरण बदलू लागले आणि एकतर्फी वाटणार्‍या निवडणुकीचे संमिश्र वातावरणात बदल झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे