जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF जवानाने गोळीबार का केला ? पोलीस आयुक्त म्हणाले..

मुंबई – जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानाकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली होती. या धक्कादायक घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असल्याचे देखील समोर आले होते. यानंतर या जवानाने नेमकं हा गोळीबार का केला ? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता याबाबतची महत्वाची माहिती समोर आली आहे.

गोळीबार केल्यानंतर आरपीएफ जवान चेतन सिंह बोरिवली स्थानकापूर्वी गाडीचा वेग मंदावताच गाडीमधून उडी टाकून फरार झाला होता. आता चेतनला अटक करण्यात आली आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन या घटनेबाबतची माहिती दिली.

गाडीत सुरक्षेसाठी कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन सिंह याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम मीना यांच्यासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिसवे यांनी दिली. चेतनने गाडीतून ऊडी मारल्यानंतर मीरा रोड येथील जीआरपी आणि आरपीएफच्या पोलिसांनी चेतनला मोठ्या शर्थीने अटक केली.त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती शिसवे यांनी यावेळी दिली.

चेतन सिंहने नेमका गोळीबार का केला असा सवाल यावेळी मध्यमकर्मींनी आयुक्तांना विचारला असता ते म्हणाले,”आताच याप्रकरणी माहिती देता येणार नाही. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सुरुवातीचा तपास अद्याप सुरु आहे. सर्व माहिती समोर आल्यानंतर त्याची खातरजमा केली जाईल त्यानंतरच या प्रकरणाबाबतची सर्व माहिती समोर आणली जाईल असं शिसवे यांनी यावेळी स्पष्ट केले.

काय घडलं नेमकं ट्रेनमध्ये
जयपूर-मुंबई (गाडी क्र. १२९५६) ही सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा सकाळी (३१ जुलै) साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे