आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंबीयांनी एकत्र जेवण्याचा आग्रह का केला जातो?

सध्याचे जीवन खूप धावपळीचे व दगदगीचे झाले आहे. त्यामुळे घरात सगळ्यांनी मिळून एकत्र जेवणे, ही खरंतर कधीतरी घडणारी घटना वाटू लागली आहे. पण, नवीन अभ्यासानुसार कुटुंबातील सर्व सदस्यांनी नियमित एकत्र जेवण केले तर, मुलांमध्ये आत्मविश्‍वास वाढतो. युरोप, अमेरिकेत सध्या सायबर धमक्‍यांचे प्रकार खूप वाढले आहेत. या धमक्‍यांना तोंड देण्यासाठीही मुले अशा एकत्र जेवणामुळे अधिक चांगली तयार होतात. कारण त्यांच्या मनात कुटुंबीयांबद्दल व कुटुंबाला त्यांच्याबद्दल विश्‍वास निर्माण झालेला असतो, असे नुकत्याच एका अभ्यासात दिसून आले आहे.

मुले आणि कुटुंबांना इंटरनेट सेफ्टी वाढविण्यासाठी “इनफ इज इनफ’ ही संस्था प्रयत्न करते. त्यांच्या अभ्यासानुसार 13 ते 17 वयोगटातील 43 टक्के युवांना सायबर धमक्‍यांचा अनुभव आला आहे. युवांवर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे अस्वस्थता, तणाव, नैराश्‍य वाढत आहे. काहीजण अगदी आत्महत्येचा विचारही करतात.

युवांमध्ये सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांना धमक्‍या कोण देते, यावर लक्ष ठेवणे पालकांनाही अवघड होऊन बसते. त्यामुळे त्यापासून संरक्षण कसे करायचे हेही प्रश्‍न आहेत.
त्यामुळे कॅनडा येथील प्रोफेसर फ्रॅंक एलगर यांनी संशोधन केले. फॅमिलीने एकत्र जेवण करणे, कुटुंबाबरोबर जास्त जिव्हाळ्याचे संबंध असणे यामुळे या गोष्टीचा तणाव किती घ्यायचा यावर परिणाम पडतो, असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार सायबर धमकी आलेल्या सहापैकी एका मुलाच्या पालकांना याबद्दल माहीत होते. तर 80 टक्के मुलांना वाटत होते, सायबर धमक्‍या पालकांपासून लपविणे सोपे असते.

कारण, या विषयावर परस्परांशी बोलण्याचा मोकळेपणा त्यांच्यात तुलनेने कमी होता. ज्या कुटुंबात एकत्र जेवणाचे प्रमाण कमी, त्यांच्यामध्ये अशा स्वरूपाच्या धमक्‍या येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे अभ्यासात दिसून आले. संशोधकांच्या मतानुसार एकत्र जेवल्याने कुटुंबातील सदस्यांचा परस्पर संपर्क वाढतो. संवाद वाढतो. ज्यांना अगदी शक्‍य नसते, त्यांनी इतर मार्गांनी मुलांशी सहवास, संपर्क वाढवला पाहिजे. म्हणजे एकत्र नाष्टा घेणे. सकाळी एकत्र व्यायाम करणे. शाळेला सोडणे. मुलांच्या आयुष्यात पालकांचा सहभाग, सहवास जास्त हवा आणि मुले ऑनलाईन काय करत आहेत, यावरही लक्ष द्यायला हवे. त्यातून सायबर बुलिंगसारख्या समस्या सुटू शकतील.

Leave a Comment