केश कर्तनालय सुरू केल्यास गुन्हा दाखल करणार : तेजस्वी सातपुते

सातारा -संचारबंदी कालावधीत केशकर्तनाचा व्यवसाय करू नये अन्यथा संबधित व्यक्तीस तसेच केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष अधिकराव लक्ष्मणराव चव्हाण यांना सातपुते यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व स्तरांवर मोठया प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत.

या अनुषंगाने शासनाने व जिल्हा प्रशासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. यानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या काळात अत्यावश्‍यक सेवा व जीवनावश्‍यक वस्तू वितरण वगळता सर्व आस्थापनांवर बंदी घालण्यात आली आहे.

यानुसार केशकर्तनालय सुरू करण्यास बंदी असून त्याचा कोणत्याही व्यक्तीने भंग केल्यास संबंधितावर भारतीय दंड सहिंताचे कलम 188, 269 व 270 अन्वये गुन्हा दाखल करणेत येईल. तसेच संचारबंदी कालावधीत शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही व्यक्तिच्या सांगण्यावरून अथवा विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन केशकर्तनाचा व्यवसाय करू नये अन्यथा संबधीत व्यक्तीस तसेच केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे सातपुते यांनी या पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Comment